राम जन्मभूमीवर रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली, आता रायगडावर...; संभाजी छत्रपती यांची थेट PM मोदींकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 06:00 PM2024-01-31T18:00:31+5:302024-01-31T18:02:43+5:30

"...मात्र सरकारची इच्छाशक्ती कमी पडताना दिसत आहे"

Ramchandra pranpratishthapana complited at Ram Janmabhoomi, now do the Reconstruction of Chhatrapati Shivaji Maharaj's Rajsadar at Raigad Sambhaji Chhatrapati's big demand to PM Narendra Modi | राम जन्मभूमीवर रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली, आता रायगडावर...; संभाजी छत्रपती यांची थेट PM मोदींकडे मोठी मागणी

राम जन्मभूमीवर रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली, आता रायगडावर...; संभाजी छत्रपती यांची थेट PM मोदींकडे मोठी मागणी

प्रभू श्री रामचंद्रांच्या पवित्र जन्मभूमीवर अतिक्रमण केलेला बाबरी ढाचा हटवून त्या पुण्यभूमीवर पुन:श्च श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना झाली. आपल्या देवदेवतांच्या पवित्र स्थानांवर झालेली अशी इतरही अतिक्रमणे हटविण्याच्या दिशेने कायदेशीर पावले टाकली जात आहेत. या मार्गात अनेक अडचणी असूनही जिद्दीने लढाई लढली जात आहे. मात्र जिथे काही अडचणी नाहीत, तिथे मात्र सरकारची इच्छाशक्ती कमी पडताना दिसत आहे. रायगडावरीलछत्रपती शिवाजी महाराजांची राजसदर पुनर्निर्मित करावी, यासाठी मी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक लक्ष घालून चालू असलेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त ठोस निर्णय घ्यावा, तीच छत्रपती शिवरायांना खरी आदरांजली ठरेल, अशी मागणी संभाजी छत्रपती यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना टॅग करत ट्विट केले आहे. 

रायगडावरीलछत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदर पुनर्निर्मिती संदर्भात बोलताना संभाजी छत्रपती म्हणाले, "दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची राजसदर पुनर्निर्मिती करावी, यासाठी मागील पाच वर्षांपासून मी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करत आहे. या पुनर्निर्मितीसाठी लागणारे वास्तू अवशेषात्मक पुरावे देखील उपलब्ध आहेत. मात्र भारतीय पुरातत्त्व विभाग हे ब्रिटिशांनी केलेले नियम दाखवत कोणत्याही कामास परवानगी देत नाही."

"भारत सरकार ब्रिटिशकालीन प्रतीकांची नावे बदलत आहे, ब्रिटिशांनी केलेले कित्येक कायदे देखील नुकतेच बदलण्यात आले. मात्र पुरातत्व विभागाचे ब्रिटिशकालीन नियम मात्र अजूनही बदलले जात नाहीत, हे दुर्दैवी आहे, असेही संभाजी छत्रपती यांनी म्हटले आहे.

"देव दैवतांच्या मंदिरांचे पुनरुज्जीवन केले जात आहे, ही बाब कौतुकास्पदच आहे. मात्र ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून देव, देश आणि धर्माचे रक्षण केले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडासाठी तरी किमान पुरातत्व खात्याचे नियम अपवाद करावेत, जेणेकरून शिवभक्तांना शिवकालीन रायगड अनुभवता येईल व संपूर्ण जगाला आपल्या इतिहासाचा हेवा वाटेल. ही मागणी घेऊन केंद्र सरकारकडे माझा पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक लक्ष घालून चालू असलेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त यावर ठोस निर्णय घ्यावा, तीच छत्रपती शिवरायांना खरी आदरांजली ठरेल," असेही संभाजी छत्रपती म्हणाले. 

Web Title: Ramchandra pranpratishthapana complited at Ram Janmabhoomi, now do the Reconstruction of Chhatrapati Shivaji Maharaj's Rajsadar at Raigad Sambhaji Chhatrapati's big demand to PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.