Gauri Sambrekar Murder Case: बंगळुरुत पत्नीला ठार करून पुण्याला पळून आलेल्या पती राकेश खेडेकरला पोलिसांनी अटक केली होती. भांडणानंतर गौरीची हत्या करुन राकेश खेडेकरने कुटुंबियांना सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांकडे येत असताना वाटेतच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी राकेशला ताब्यात घेतलं. या दोघांमध्ये छोट्या छोट्या कारणावरून वाद व्हायचे. मात्र या दोघांमधील वाद इतक्या टोकाला जाईल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. तपासादरम्यान, एका मराठी गाण्यावरुन वाद झाल्यानंतर राकेश संतापला आणि त्याने गौरीची हत्या केल्याचे समोर आलं.
गौरीचा भोसकून खून करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून घरातून पळून जाणाऱ्या राकेशने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या राकेश खेडेकरने २६ मार्चच्या रात्री हुलीमावूजवळील दोड्डाकम्मनहल्ली येथील त्यांच्या घरी पत्नी गौरी सांब्रेकरची हत्या केली होती. त्यानंतर राकेशने नातेवाईकांकडे फोन करुन गौरीची हत्या केल्याचे सांगितले. राकेशला २ एप्रिल रोजी पोलीस कोठडीत आणण्यात आले. चौकशीदरम्यान राकेशने सांगितले की, गौरी नेहमीच आई-वडील आणि लहान बहिणीचा अपमान करत असल्याने तो नाराज होता.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गौरी नेहमी माझे वडील, आई आणि बहिणीबद्दल वाईट बोलायची. ती नेहमीच घरात आणि बाहेर माझा अपमान करत असे. आपण बंगळुरुला जाऊन, नवीन नोकरी शोधावी आणि नवीन आयुष्य सुरू करू, असे तिने सुचवले होते. शाळेपासून माझं तिच्यावर प्रेम होते. तिला बंगळुरूमध्ये जवळपास एक महिना नोकरी न मिळाल्याने, आम्ही परत मुंबईला जावे अशी तिची इच्छा होती आणि यावरून अनेकदा वादही व्हायचा,” असं राकेशने सांगितले.
राकेशने कबुलीजबाबात सांगितले की, २६ मार्चच्या संध्याकाळी गौरी आणि मी घरी एकट्यात काही वेळ घालवला. नंतर आम्ही फिरायला जवळच्या मोकळ्या जागेत गेलो. घरी परतत असताना मी दारू आणि नाश्ता घेतला. संध्याकाळी ७.३० च्या सुमारास आम्ही घरी आलो. काम आटोपल्यानंतर जवळपास दररोज दारू प्यायचो. गौरी मला नाश्ता देऊन, गाणी लावून साथ देत असे. त्या रात्री दोघांनीही आपापली आवडती गाणी लावण्याचे ठरवले.
"गौरी भात बनवत असताना राकेश ग्लास घेऊन बसला आणि गाणी वाजवू लागला. काही गाण्यानंतर गौरीने एक मराठी गाणे लावले ज्यामध्ये वडील आणि मुलाच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. गाण्यावरुन गौरीने त्याची खिल्ली उडवली. ती त्याच्या चेहऱ्याजवळ गेली, गाल फुगवले आणि त्याच्या तोडांवर फुंकर मारली. राकेशने चिडून तिला मागे ढकलले आणि ती किचनजवळ पडली. तिने चिडून किचनमधून चाकू उचलला आणि शिवीगाळ करत त्याच्यावर फेकला. रागाच्या भरात राकेशने रात्री ८.४५ ते ९ च्या दरम्यान चाकूने तिच्या मानेवर दोनदा पोटात वार केले. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला. त्यानंतर तो तिच्या शेजारी बसला आणि तुझ्या अशा वागण्याने मी चिडलो असं सांगू लागला," अशी माहिती पोलिसांनी दिली.