मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर राजू शेट्टी मोर्चा काढणार
By मोरेश्वर येरम | Updated: December 16, 2020 16:33 IST2020-12-16T16:28:53+5:302020-12-16T16:33:43+5:30
येत्या २२ डिसेंबर रोजी मुंबईत मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं.

मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर राजू शेट्टी मोर्चा काढणार
पुणे
केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदे हे मुकेश अंबानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींसाठी आणले आहेत, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. याचा विरोध म्हणून मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचं राजू शेट्टी यांनी जाहीर केलं आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. येत्या २२ डिसेंबर रोजी मुंबईत मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या ऑफीसपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. यात अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बाबा आढाव देखील सहभागी होणार असल्याचंही शेट्टी यांनी सांगितलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या मोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.
शेतकरी संघटनांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; रस्ता रोखणाऱ्यांची नावं मागवली
"केंद्र सरकारला जर शेतकऱ्यांना खरंच काही द्यायचं असेल तर हमीभाव द्या. उगाच त्यांच्यावर नको असलेले कायदे लादू नका", असं राजू शेट्टी म्हणाले. यासोबतच मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाही एकत्र असल्याचं शेट्टी म्हणाले.