“...तर राजकीय संन्यास घेईन”; शिंदे गटात जातानाच राजन साळवींनी दिले ठाकरे गटाला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:47 IST2025-02-13T15:45:44+5:302025-02-13T15:47:41+5:30
Rajan Salvi News: गेल्या ३८ वर्षांमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशांनुसार काम केले, असे राजन साळवी यांनी म्हटले आहे.

“...तर राजकीय संन्यास घेईन”; शिंदे गटात जातानाच राजन साळवींनी दिले ठाकरे गटाला आव्हान
Rajan Salvi News: गेल्या काही महिन्यांपासून माजी आमदार राजन साळवी यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. यानंतर राजन साळवी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भात खुद्द राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातून ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक यांच्यासह अनेक जण शिवसेना शिंदे गटात सामील होत आहेत. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. एकीकडे स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली असली, तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत चालल्याचे दिसत आहे. असेच सुरू राहिल्यास आगामी महापालिका निवडणुका या ठाकरे गटासाठी मोठे आव्हान ठरू शकते, असे सांगितले जात आहे. यातच राजन साळवी यांनी शिंदे गटात जातानाच ठाकरे गटाला आव्हान दिले.
...तर राजकीय संन्यास घेईन
राजन साळवी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार हे निश्चित होताच ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली. याबाबत राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या. विनायक राऊतांनी नितेश राणे यांचे नाव घेत निवडणुकीच्या काळात राणे यांचे काम केल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना, गेल्या ३८ वर्षांमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशांनुसार काम केले. ठामपणे सांगू शकतो की, माझ्याकडून एक अंश चुकीचे काम झाले नाही. असेल तर त्याची माहिती द्यावी. कुणाकडून पैसे घेतल्याचा आरोप असेल तर त्यांनी सिद्ध करावा. त्यांनी पुरावा दिल्यास त्याच दिवशी मी राजकीय संन्यास घेईन, असे थेट आव्हानच राजन साळवी यांनी दिले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरू होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत जाऊ शकलो नाही. पण, जाण्यासाठी निमित्त लागते. ते निमित्त लागले आणि याठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेतला. आजच्या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत होते. राजन साळवीला कुठे मानसन्मान द्यायचा, कसा द्यायचा याची सर्व जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. सामंत बंधुही समाधानी आहेत. आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे. भविष्यात आम्ही एकत्रपणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काम करू, असे वचन आम्ही एकनाथ शिंदे यांना दिले आहे, असे राजन साळवी यांनी म्हटले आहे.