Rajan Salvi Uddhav Thackeray News: गेल्या काही महिन्यांपासून माजी आमदार राजन साळवी यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजन साळवी लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ही राजकीय घडामोड ठाकरेंना कोकणात धक्का देणारी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासूनच राजन साळवी यांच्या पक्षांतराच्या चर्चांना तोंड फुटले होते. पण, त्या त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. शिवसेना फुटीनंतरही साळवी ठाकरेंसोबत राहिल्याने त्यांना मातोश्रीचे निष्ठावंत समजले जात होते. पंरतु पक्षातीलच स्थानिक नेत्यासोबत खटके उडाल्याने ते नाराज होते.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
राजन साळवी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, राजन साळवी हे गुरूवारी म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश करणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे राजन साळवी हे आमदार होते. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राजापूर, लांजा आणि साखरपा या भागात साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पक्षात कुरबुरी सुरू झाल्या. माजी खासदार विनायक राऊत यांच्यासोबत वाद झाला. त्यात ठाकरेंनी राऊतांची बाजू घेतल्याने साळवी नाराज होते, असे सांगितले जाते.
ठाकरेंचे अनेक नेते संपर्कात असल्याचे दावे
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून याबद्दलचे संकेत दिले जात होते. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते संपर्कात आहे, असा दावा उदय सामंत यांनी केला होता. काही आमदार आणि खासदारही संपर्कात असल्याचे दावे शिंदेसेनेकडून केले जात आहेत.