मुंबई - कोकणात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नुकतेच राजन साळवींचा पक्षप्रवेश आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही असं विधान राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी मांडले होते. त्यानंतर आजच राजन साळवींचा पक्षप्रवेश होत आहे. त्यामुळे सामंत बंधू यांना डावलून राजन साळवींना पक्षात घेतलं जातंय का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याच घडामोडीत आमदार किरण सामंत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
एकीकडे राजन साळवी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा असताना दुसरीकडे किरण सामंत यांनी अचानक राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आमदार किरण सामंत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये २०-२५ मिनिटे चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशावर झाली याबाबत अद्याप काही समोर आले नाही. मात्र किरण सामंत राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशामुळे नाराज असल्याचंही बोलले जाते. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर काय म्हणाले होते किरण सामंत?
बुधवारी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मंत्री उदय सामंत, किरण सामंत आणि राजन साळवी यांच्यात बैठक झाली. गेल्या काही दिवसापासून साळवी आणि सामंत यांच्यात अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे, हा वाद काल मिटवल्याचा दावा आहे. या बैठकीनंतर किरण सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. राजन साळवी आज आमच्यासोबत आहेत आणि उद्यापण आमच्यासोबत आहेत. त्यांना योग्य तो मान सन्मान मिळेल. आमची बैठकीत पक्ष प्रवेश कसा असेल याबाबत चर्चा झाली. मोठं शक्तिप्रदेर्शन असेल, त्यांना योग्य तो मानसन्मान मिळेल, त्यांना काय द्यायचं यावर चर्चा झाली नाही असं किरण सामंत यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, राजन साळवी यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश का झाला नाही? तिथे विरोध कोणी केला? आता सामंत बंधूनी त्यांचे स्वागत केले असेल तर मला माहित नाही. पण आता हे स्वागत आहे की, त्यांना कबड्डी कबड्डी करून आत घेऊन त्यांना आपटायची तयारी आहे? हे येत्या काळात दिसेल असा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर लगावला.