ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी बहुजन विकास आघाडीचे राजन पाटील बिनविरोध
By Admin | Updated: April 18, 2017 21:12 IST2017-04-18T18:26:00+5:302017-04-18T21:12:28+5:30
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बहूजन विकास आघाडीचे राजन पाटील यांची बिनविरोध निवड

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी बहुजन विकास आघाडीचे राजन पाटील बिनविरोध
>ऑनलाइन लोकमत
ठाणे,दि.18 - ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बहुजन विकास आघाडीचे राजन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक दिलीप उडाण यांनी जाहीर केले.
तब्बल सात हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या जिल्हा बँकेवर 59 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे संचालक पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, सर्व संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगिरथ भोईर यांच्यासह बँकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे यावेळी अभिनंदन केले.
बाबाजी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी आणि भाजपने एकत्र येत उपाध्यक्षा सुनीता दिनकर यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली होती. अध्यक्षपद रिक्त असल्याने या पदासाठी 18 एप्रिल रोजी निवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी 11.30 वा. पर्यंत बहुजन विकास आघाडीचे राजन पाटील यांचा एकमेव अर्ज आला. 11.35 पर्यंत या अर्जाची छानणी होऊन तो वैध झाला. अन्य कोणाचाही अर्ज न आल्याने 19 संचालकांच्या मान्यतेने त्यांचीच अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे उडाण यांनी जाहीर केले. राजीनामा चर्चेच्या वेळी अनुपस्थित असलेले मावळते अध्यक्ष बाबाजी पाटील आणि सुभाष पवार हेही यावेळी उपस्थित होते. प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणा-या सुनीता दिनकर यांच्याकडे पुन्हा उपाध्यक्षपदाची सूत्रे आली आहेत.
‘‘स्पर्धेच्या युगात जिल्हा बँक सध्या दुस-या स्थानावर आहे. ती अग्रस्थानी कशी राहील यासाठी विशेष प्रयत्न राहील. बचतगट, शेतकरी आणि लघुउद्योजक यांना कर्ज देऊन बँकेची यशस्वी वाटचाल करण्याचा मानस आहे. सर्व संचालकांच्या सहकार्याने बँक प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार. बँकेचा सिडी रेशो 38 वरून 31 आला आहे. तो वाढविण्यावर भर देणार आहे.
’’ राजेंद्र पाटील, अध्यक्ष, ठाणो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
व्याज दरात घट होणार-
नवनिर्वाचित अध्यक्ष राजन पाटील हे गेल्या आठ वर्षापासून बँकेवर संचालक आहेत. बँकेमध्ये वसई तालुका शेती सहकारी संस्थांचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्या रुपाने बँकेच्या 59 वर्षाच्या इतिहासात बहुजन विकास आघाडीला प्रथमच अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. विविध आव्हानांशी स्पर्धा करण्यासाठी जिल्हा बँक सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याज दरामध्ये 1 मे 2017 पासून मोठया प्रमाणात घट करणार असल्याचे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच पाटील यांनी जाहीर केले.