मुंबई - २०१९ विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. गेल्या ५ वर्षात अनेक उलथापालथी राजकीय वर्तुळात पाहायला मिळाल्या. त्यात प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकेकाळचे मित्र कट्टर राजकीय विरोधक बनले. उद्धव ठाकरेंनी तर २०२४ च्या निवडणूक प्रचारात एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं टोकाचं विधान फडणवीसांच्या बाबतीत केले होते मात्र तरीही आज एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जिव्हाळा संस्थेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांना रॅपिड फायर प्रश्न विचारले गेले. त्यात पहिलाच प्रश्न राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, राजकारणात काही पक्क नसते. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, आता राज ठाकरे झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत असं फडणवीसांनी म्हटलं.
विधानसभा निवडणूक निकालानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ठाकरे-फडणवीस पुन्हा जवळीक वाढल्याचं दिसून आले. त्यानंतर सेनेच्या सामना मुखपत्रात देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणारा एक अग्रलेख प्रसिद्ध झाला. इतकेच नाही तर अलीकडे आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा फडणवीसांसोबत जुळवून घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यात आजच्या मुलाखतीत फडणवीसांनी केलेले सूचक विधान चर्चेत आले आहे.
दरम्यान, खूप मनापासून ज्याच्यावर विश्वास ठेवावा असे सहकारी अजित पवार की एकनाथ शिंदे असाही प्रश्न फडणवीसांना विचारला गेला. तेव्हा माझ्यापुरतं विचाराल तर माझे दोघांशी घनिष्ट संबंध आहेत. एकनाथ शिंदेंसोबत माझी जुनी मैत्री आहे. अजित पवारांजवळ जी राजकीय परिपक्वता आहे त्यामुळे खूप जास्त माझे आणि त्यांची मते जुळतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.