MNS News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. त्यावेळी निशिकांत दुबे यांना जय महाराष्ट्र बोलत तिथून काढता पाय घ्यावा लागला. यानंतर आता मनसेकडून या खासदारांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित खासदारांना रोकडा सवाल करण्यात आला आहे.
मराठी माणसांना आपटून आपटून मारेन..., अशी दर्पोक्ती करणाऱ्या भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी संसदेत घेराव घातला आणि त्यांना त्यांच्या बेताल विधानाचा जाब विचारला. यासाठी तिन्ही खासदार महोदयांचे मनापासून अभिनंदन. पण महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का आहेत ? मराठी माणसाचा अपमान या ४५ खासदारांना सहन कसा होऊ शकतो ? तुमच्यासाठी मराठी माणूस आणि अपमान हा अस्मितेचा विषय नाही का? अशी विचारणा मनसेकडून करण्यात आली आहे. मनसेने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
काँग्रेसच्या महिला खासदारांची कृती अभिमानास्पद
काँग्रेसच्या तीन महिला खासदारांनी जी कृती केली, ती अभिमानास्पद होती. खरेतर काँग्रेसची भूमिकाही हिंदीधार्जिणी असते. पण पक्ष न पाहता या तिघींनी निशिकांत दुबेंसारख्या नेत्याला जाब विचारला. हे करण्यासाठी धैर्य लागते. हे धैर्य महिला खासदारांनी दाखवले, त्याबद्दल मनसे पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात येईल. आम्हाला पुरूष खासदारांकडून अपेक्षा होती. महाराष्ट्रात जन्मलेले खासदार आपल्या भाषेसाठी संसदेत निशिकांत दुबेंना जाब विचारतील, असे वाटले होते. परंतु, त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. याउलट काँग्रेसच्या महिला खासदारांनी पुढाकार घेऊन मराठीचा सन्मान केला, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.
दरम्यान, आपण सगळे मराठी म्हणून एकत्र येत आहोत, हे जास्त महत्त्वाचे आहे. पक्ष कोणता, हे महत्त्वाचे नाही. पण मराठी म्हणून त्यांचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि त्याबाबत त्यांनी जाब विचारला. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.