भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीएशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. शपथविधीनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं असून, पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करताना राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं की, आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.
पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा, असेही राज ठाकरे यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.