विदर्भासह मराठवाड्याला पावसाचा इशारा
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:58+5:302016-03-16T08:36:58+5:30
तापमानातील चढ-उतार आणि अवकाळी पाऊस; अशा दुहेरी वातावरणाचा फटका राज्याला बसत आहे. येत्या ७२ तासांत मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची

विदर्भासह मराठवाड्याला पावसाचा इशारा
मुंबई : तापमानातील चढ-उतार आणि अवकाळी पाऊस; अशा दुहेरी वातावरणाचा फटका राज्याला बसत आहे. येत्या ७२ तासांत मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून येत्या ४८ तासांत ते ३३ अंशांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यातील हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील किमान तापमानातही घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे.
चंद्रपूर, गोंदियात गारपीट
चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत मंगळवारी जोरदार वादळी पाऊस व गारपीट झाली. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून एक शेतकरी व चार बकऱ्या ठार झाल्या. नागभीड तालुक्यातील तळोधी (बां.) लगतच्या कोजबी माल येथील अरविंद पांडुरंग मेश्राम (४०) यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली. अरविंद मेश्राम हे म्हशींचा कळप घेऊन गावाकडे परत येत होते. याच परिसरात घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत चार बकऱ्यांवर वीज कोसळल्याने बकऱ्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)