लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच शनिवारी पावसाचाही जोर वाढला. २१ ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांसह यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट व गडगडाटासह पाऊस पडू शकतो. ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, समुद्रात खतळलेली स्थिती राहील, त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीत नागरिकांना 'सचेत' अॅपमार्फत अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नद्यांना पूर, खबरदारीच्या सूचना
रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी, तर कुंडलिका नदी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून, याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. पूरस्थितीपासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या असून, खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू
विक्रोळी पार्कसाइट येथील वर्षानगर भागात शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दरड कोसळून वडील आणि मुलीचा मृत्यू झाला, तर आई आणि मुलगा जखमी झाले. मुंबई आणि परिसरात गेल्या २४ तासांत २५० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत तुफान कोसळलेल्या पावसादरम्यान हवामान खात्याने शनिवारी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला होता. परंतु दिवसभर मुंबईत कुठेच इशाऱ्यापर्यंत पाऊस पडला नाही.