घुंगरु वाजल्यानंतर पडतो पाऊस !
By Admin | Updated: July 13, 2016 19:01 IST2016-07-13T19:01:39+5:302016-07-13T19:01:39+5:30
होमहवन केल्यानंतर किती पाऊस पडतो हा संशोधनाचा विषय असला तरी मल्हार राग आळवला की पाऊस पडतो म्हणतात़

घुंगरु वाजल्यानंतर पडतो पाऊस !
अरविंद हजारे/ऑनलाइन लोकमत
जवळा (अहमदनगर), दि. 13 - पावसासाठी अनेक ठिकाणी होमहवन केले जातात. होमहवन केल्यानंतर किती पाऊस पडतो हा संशोधनाचा विषय असला तरी मल्हार राग आळवला की पाऊस पडतो म्हणतात़ पण जामखेड तालुक्यातील जवळा येथे नर्तिकांच्या पायातील घुंगरांचा आवाज झाला की हमखास पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे़ म्हणूनच गावात आषाढी एकादशीला नर्तिका पायात घुंगरु चढवतात़
जामखेड तालुक्यातील जवळा येथे आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी (दि़१५) रथयात्रेस प्रारंभ होत आहे. जवळेश्वर यात्रेमध्ये नृत्यांगना मोठ्या प्रमाणात नृत्य करण्यासाठी येतात. गावातील प्रत्येक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या नर्तिकांच्या पायातील घुंगरु वाजल्यानंतर पाऊस पडतो, अशी आख्यायिका आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे़ मात्र, जवळा येथे अद्याप पाऊस नाही़ दरवर्षी आषाढी एकादशीनंतर जवळा येथे मोठा पाऊस होतो़ आषाढी एकादशीनिमित्त गावात आलेल्या नर्तिकांच्या घुंगरांच्या आवाजामुळेच पाऊस पडतो, अशी येथील पिढीजात धारणा आहे़ त्यामुळे या यात्रेला मोठे महत्व असते़
ही रथयात्रा १९ जुलैपर्यंत चालणार आहे. ही रथयात्रा आषाढ शुद्ध एकादशी ते गुरुपौर्णिमा असे ५ दिवस चालते. आषाढी एकादशीच्या दिवशी जवळ्याचे ग्रामदैवत जवळेश्वराची आरती करून रथयात्रेस प्रारंभ होतो. गावातील एकूण १० मंडळांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम रात्रभर चालतो. नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळा पंचक्रोशीतील हजारो लोक येतात. पहिल्या दिवशी सर्व मंडळांच्या नर्तिका जवळेश्वर मंदिरात येऊन जवळेश्वराची आरती करतात. यात्रेमध्ये विद्युत रोषणाई डोळे दिपवणारी असते. शेवटच्या दिवशी म्हणजे ५ व्या दिवशी जवळेश्वराच्या मुकुटाची रथामध्ये प्रतिष्ठापना केली जाते. दुपारी जवळेश्वराची आरती करून मुख्य रस्त्याने मिरवणूक निघते. रथासमोर नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम असतो. रथास मोठमोठे दोर लावून ओढले जाते. रथ ओढण्यास ५० ते ६० लोक लागतात. रथाला नारळाचे तोरण अर्पण करतात. जवळजवळ ३०,४० हजार नारळांचे तोरण रथात असते.
१०० वर्षांचा रथ
राज्यातील सर्वांत मोठा साधारण १०० वर्षांपूर्वीचा हा रथ आहे. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला येदू सुरवसे या सुताराने तो तयार केला आहे. त्यामुळे रथात बसण्याचा मान सुरवसे परिवाराला आहे. अजून रथाची कसलीही मोडतोड झालेली नाही. दरवर्षी रथास तेल लावून मगच त्यात मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते.