रेल्वे मार्गाचे काम एप्रिलपासून
By Admin | Updated: January 21, 2016 03:57 IST2016-01-21T03:57:29+5:302016-01-21T03:57:29+5:30
जयगड बंदर कोकण रेल्वे मार्गाशी जोडण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या जयगड ते डिंगणी मार्गासाठी जमीन भूसंपादनाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार

रेल्वे मार्गाचे काम एप्रिलपासून
मुंबई : जयगड बंदर कोकण रेल्वे मार्गाशी जोडण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या जयगड ते डिंगणी मार्गासाठी जमीन भूसंपादनाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार असून एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची ७० वी बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील बंदरांचा विकासासाठी शासन आग्रही आहे. कोकण रेल्वे कार्पोरेशन, जयगड बंदर आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत जयगड ते डिंगणी हा ३५ कि.मी.चा नवीन रेल्वेमार्ग निर्माण करण्यात येत आहे. ७७५ कोटींच्या या प्रकल्पाच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण कोकण रेल्वे कार्पोरेशनने पूर्ण केले आहे.
या बैठकीत व्यापक ‘बंदर विकास धोरण-२०१५’ च्या सद्य:स्थितीवर त्याचबरोबर रेवस-आवरे, विजयदुर्ग व रेडी या बंदर विकास प्रकल्पांना मुदतवाढ देण्याबाबत चर्चा झाली. तसेच ‘महाराष्ट्र जलक्रीडा प्रकल्प धोरण-२०१५’ तयार करण्यात आले असून त्यास बोर्डाची मान्यता देण्यात आली. तर डहाणू तालुक्यातील वाढवण येथे सॅटेलाईट पोर्टच्या निर्मितीकरिता जेएनपीटी व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील सामंजस्य करारास मंजुरी देणे, दिघी-रोहा रेल्वे जोडणी प्रकल्पात बोर्डाने घ्यावयाचे समभाग, पनवेल खाडीमध्ये मौजे उलवा येथे शिपयार्ड प्रकल्प निर्माण करणे, वांद्रे-वरळी सागरी सेतुनजीक माहीम खाडीमधील बोर्डाच्या मालकीच्या जेट्टीवरुन तरंगते हॉटेल प्रकल्प चालविणे, ठाणे खाडी किनारी वाशी पुलाजवळ मौजे तुर्भे येथे बहुउद्देशीय जेट्टी निर्माण करणे, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे बोर्डाच्या स्वमालकीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे, रेवस येथे अंतर्गत जल वाहतूक प्रकल्पांतर्गत रो-रो जेट्टी तसेच सुविधा विकसित करणे आदी विषयांचे सादरीकरण करण्यात आले.