रेल्वे तिकीट दलालास रंगेहात अटक
By Admin | Updated: June 30, 2016 20:40 IST2016-06-30T20:40:42+5:302016-06-30T20:40:42+5:30
दोनवेळा आरक्षणाचे तिकीट खरेदी करीत असताना तिसऱ्यांदा पुन्हा तिकीट खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका तिकीट दलालास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात अटक करून त्याच्याकडून

रेल्वे तिकीट दलालास रंगेहात अटक
नागपूर : दोनवेळा आरक्षणाचे तिकीट खरेदी करीत असताना तिसऱ्यांदा पुन्हा तिकीट खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका तिकीट दलालास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात अटक करून त्याच्याकडून ७४० रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. ही घटना दुपारी २.२० वाजता संत्रा मार्केट परिसरातील आरक्षण कार्यालयात घडली.
संदीप प्रकाश तायडे (३०) रा. खलाशी लाईन, मोहननगर नागपूर असे अटक करण्यात आलेल्या तिकीट दलालाचे नाव आहे. तो दुपारी २ वाजता संत्रा मार्केट परिसरातील आरक्षण कार्यालयात तिकीट खरेदी करण्यासाठी आला होता. तो गरजू नागरिकांकडून २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन त्यांना आरक्षणाचे तिकीट उपलब्ध करून देतो. संत्रा मार्केट आरक्षण कार्यालयात आल्यानंतर त्याने दुपारी २.११ वाजता एक आरक्षणाचे रायपूरचे तिकीट खरेदी केले. त्यानंतर पुन्हा तो रांगेत उभा राहिला आणि त्याने भोपाळला जाण्याचे आरक्षणाचे तिकीट दुपारी २.१३ वाजता खरेदी केले. त्यानंतर दुपारी २.१५ वाजता तो पुन्हा रांगेत लागून तिकीट खरेदी करण्यासाठी गेला. त्याच्यावर संशय आल्यामुळे तेथे उपस्थित आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक संजय पुरकाम, विकास शर्मा यांना त्याच्यावर शंका आली. यावेळी तेथे आरपीएफच्या गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अरुण ठवरे पोहोचले. त्यांनी आरोपीची चौकशी केली असता, त्याने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची कबुली दिली. लगेच त्यास अटक करून त्याच्याविरुद्ध रेल्वे अॅक्ट १४३ बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून आरक्षणाची ७४० रुपयांची तिकिटे, कोरे अर्ज आणि रोख ३०० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.