रेल्वे मेडिकल कॉलेजला ब्रेक!
By Admin | Updated: December 5, 2014 00:39 IST2014-12-05T00:39:27+5:302014-12-05T00:39:27+5:30
ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी २००९-१० च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यान ७ रेल्वेमंत्री

रेल्वे मेडिकल कॉलेजला ब्रेक!
केंद्र शासनाचे सूतोवाच : एकाही खासदाराने केला नाही पाठपुरावा
नागपूर : ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी २००९-१० च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यान ७ रेल्वेमंत्री बदलले परंतु त्यांच्या घोषणेचे काहीच होऊ शकले नाही. दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणा रद्द करण्यात आल्याचे सूतोवाच केल्यामुळे रेल्वेच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्तावच बारगळला आहे. विदर्भातील एकाही खासदाराने याबाबत पाठपुरावा न केल्यामुळे नागपुरातील रेल्वेचे मेडिकल कॉलेज उभे होऊ शकले नाही, हे विशेष.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. घोषणा झाल्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर रेल्वे हेल्थ सर्व्हिसेसचे महासंचालक रामटेके आणि त्यांची चमू नागपुरात दाखल झाली होती. त्यांनी गोधनी आणि खापरी येथील दोन जागांची पाहणीसुद्धा केली होती. या दोन जागांपैकी एका जागेची निवड रेल्वे मेडिकल कॉलेजसाठी करावयाची होती. पाहणी केल्यानंतर चमू रेल्वे बोर्डात परतली. त्यांनी जागेचा अहवालही सादर केला. परंतु त्यानंतर त्यांचा अहवाल रेल्वे मंत्रालयात तसाच धूळखात पडून होता. रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी रेल्वेकडे २५ एकर जागा, ५०० खाटांचे रुग्णालय असले तरच मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावाला मान्यता मिळते. दोन्ही बाबी नागपुरात शक्य असताना केवळ राजकीय उदासीनतेपोटी नागपूरच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. सध्या हा प्रस्ताव केंद्र शासनाने रद्द झाल्याची घोषणा केली आहे. रेल्वेचे नागपुरात मेडिकल कॉलेज झाले असते तर विदर्भातील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना या मेडिकल कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळू शकला असता. याशिवाय मेडिकल कॉलेजमध्ये लागणाऱ्या जागांसाठी अनेक उमेदवारांना संधी मिळाली असती. रेल्वेचे देशभरात १३ लाख कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुलांना मेडिकलला प्रवेशाचा मार्ग खुला झाला असता. परंतु आता ही घोषणाच केंद्र शासनाने रद्दबातल ठरविल्यामुळे उरलीसुरली आशाही मावळली आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे रुग्णालयाचा ताण झाला असता कमी
नागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू झाले असते तर ‘डीआरएम’ कार्यालयाच्या शेजारील रुग्णालयाचा ताण कमी झाला असता. या रुग्णालयात नेहमीच रुग्णांची गर्दी असते. येथे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. मेडिकल कॉलेज सुरू झाले असते तर या रुग्णालयावरील ताण कमी झाला असता.
सात रेल्वेमंत्री बदलले
ममता बॅनर्जी यांनी अर्थसंकल्पात रेल्वेच्या मेडिकल कॉलेजची घोषणा केल्यानंतर सात रेल्वेमंत्री बदलले. यात दिनेश त्रिवेदी, मुकुल रॉय, सी.पी. जोशी, पवनकुमार बंसल, मल्लिकार्जुन खरगे, सदानंद गौडा, सुरेश प्रभु यांचा समावेश आहे. परंतु या रेल्वेमंत्र्यांपैकी एकालाही विदर्भातील मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावावर विचार करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीअभावी नागपुरातील रेल्वेचे मेडिकल कॉलेज पूर्ण होऊ शकले नसल्याचे बोलले जात आहे.