"लोकशाहीची हत्या तुम्हाला विनोद वाटतो का?"; मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 22:52 IST2025-02-07T22:45:28+5:302025-02-07T22:52:05+5:30
Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते ...

"लोकशाहीची हत्या तुम्हाला विनोद वाटतो का?"; मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाचा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीआधी तब्बल ३९ लाख मतदार वाढले कसे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
राहुल गांधी यांनी खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरुन निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे असा दावाही राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगाने तातडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीची फोटोसह असलेली मतदार यादी द्यावी आपल्याला द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली असल्याचे म्हटलं होतं.
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. लोकशाहीची जी हत्या केली आहे तो तुम्हाला विनोद वाटत आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
"राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार संख्या कशी वाढली याबाबत प्रश्न उपस्थित केला. पाच महिन्यांमध्ये ४० लाख मतदार कसे वाढले. हे मतदार आले कुठून त्यावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. तोच तोच विनोद सांगितला की पुन्हा कोणाला हसायला येत नाही, असं त्यांनी म्हटलं. तुम्ही लोकशाहीची जी हत्या केली आहे तो तुम्हाला विनोद वाटत आहे का? आजच्या पत्रकार परिषदेत आमचा ईव्हीएमवर आक्षेप नव्हता तर तुम्ही ज्या बोगस पद्धतीने मतदार घुसवले आहेत त्यावर होता," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"त्यांनी लोकसभा निकालाचा अभ्यास केला असं म्हणतात. कोणत्या मतदारसंघात त्यांना आघाडी मिळाली, कोणत्या मतदारसंघात आघाडी मिळाली तरी जिंकू शकत नाही याचा त्यांनी अभ्यास केला. त्यातले त्यांनी मतदार बरोबर हेरले आणि बाजूच्या मतदार संघात ते नोंदवले आणि त्यांच्या उमेदवाराला मतदान करून घेतलं," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.