राहुल गांधी आपल्या पूर्वजांची पापं लपवण्यासाठी सावरकरांसंदर्भात वक्तव्ये करत आहेत आणि मुस्लिम व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. राहुल गांधी यांनी संसदेत केलेले वक्तव्य हे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे, असे म्हणत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
रणजीत सावरकर राहुल गांधी यांना आव्हान देत म्हटले, "राहुल गांधी यांनी हीच विधाने सार्वजनिक मंचावर करावीत, म्हणजे, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येईल. राहुल गांधी यांनी जो कागद वाचला, तो त्यांना कोणत्या गटारात सापडला, माहीत नाही. त्यांच्या पूर्वजांची, प्रामुख्याने नेहरू यांनी जी पापं केली आहेत, ती लपवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत."
रणजित सावरकर पुढे म्हणाले, "वीर सावरकरांचा संविधान आणि लोकशाहीवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी 1945 मध्ये एक मसुदा तयार केला होता. त्यात कोणताही भेदभाव न करता देश चालवला जावा, असे म्हणण्यात आले होते. यात धर्म ही खाजगी बाब मानून लोकांना आपापल्या घरात धर्माचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते." एवढेच नाही, तर गांधी आणि नेहरूंवर हल्ला करत रणजित सावरकर म्हणाले की, ते संविधानविरोधी होते आणि काँग्रेस हा सर्वात घटनाविरोधी पक्ष आहे.
...म्हणून उद्धव ठाकरे यांचे राजकीय पतन -यावेळी रणजित सावरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवरही निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा पक्ष सावरकरांच्या विचारांपासून दूर जात आहे. पूर्वी सावरकरांचे समर्थन करणारे शिवसेनेचे खासदार आता गायब झाले आहेत. एवढेच नाही तर, पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यानेच उद्धव ठाकरे यांचे राजकीय पतन झाल्याचेही ते म्हणाले.
संसदेत सावरकरांसंदर्भात काय म्हणाले होते राहुल? -संसदेत संविधानावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारबरोबरच स्वातंत्र्यवीर सावरकरांवरही निशाणा साधला. सावरकरांना माफी वीर म्हणत ते म्हणाले, "सावरकर इंग्रजांशी तडजोड करून माफी मागणारे होते. सावरकर मनुस्मृती मानत होते. जे संविधानाच्या विरोधात आहे. इंदिरा गांधींचा उल्लेख करत ते म्हणाले, सावरकरांनी संविधानात भारतीयत्व बघितले नाही." त्यांच्या या विधानावर सभागृहात गदारोळ झाला.