महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन-५०० नंतर ॲमॉक्सही बनावट; उत्तराखंडहून येतायत ही औषधे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 08:08 IST2024-12-10T08:08:20+5:302024-12-10T08:08:42+5:30
मुख्य आरोपी कारागृहात : उत्तराखंड येथील कंपनीकडून महाराष्ट्रात औषध पुरवठा; सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ

महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन-५०० नंतर ॲमॉक्सही बनावट; उत्तराखंडहून येतायत ही औषधे...
- सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ॲझिथ्रोमायसीन ५०० ही गोळी बनावट असल्याचे समोर आले होते. आता ॲमॉक्स ही गोळीही बनावट असल्याचेही उघड झाले आहे. उत्तराखंडच्या मिस्ट्रॉल फॉर्मुलेशन या कंपनीने याचे उत्पादन केले आहे. राज्यात या बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी ठाणे येथील विजय शैलेंद्र चौधरी हा सध्या कारागृहात आहे.
अंबाजोगाईत २५,९०० बनावट गोळ्यांचा पुरवठा केल्याचे औषध प्रशासनाच्या तपासणीतून समोर आले. त्यानंतर चौघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. या चौघांनी राज्यात ॲझिथ्रोमायसीन ५०० या ८५ लाख गोळ्यांचा पुरवठा केला आहे. अंबाजोगाईच्या महाविद्यालयात कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेस यांनी पुरवठा केला होता. याच कंपनीने ॲमॉक्सच्याही दीड लाखांहून अधिक गोळ्या खरेदी केल्या होत्या. त्याचा पुरवठा अंबाजोगाईसह नागपूर, ठाणे, वर्धा येथे केल्याचे सांगण्यात आले. आता याच गोळ्या योग्य ते घटक नसल्याने अप्रमाणित केल्या आहेत.
गोळ्या पुरवठ्याची अशी साखळी
मे. काबीज जनरिक हाऊस ठाणे हा बाजारातून बनावट औषधी खरेदी करत होता. तो पुढे मे. ॲक्वेटीस बायोटेक प्रा. लि. भिवंडी यांना द्यायचा तेथून मे. फार्मासिस्ट बायोटेक, सूरत व मे. विशाल एंटरप्रायेजस, कोल्हापूर यांना देत असे.
कोल्हापूरच्या कंत्राटदाराकडून शासकीय रुग्णालये, वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा केला जात होता. त्यांनी पुरवलेल्या गोळ्यांवर उत्तराखंडच्या मिस्ट्रॉल फॉर्मुलेशन या कंपनीचे नाव आहे.
२०२२ पासून गोळ्यांचा होतोय पुरवठा
nमे. विशाल एंटरप्रायजेसचे सुरेश पाटील यांना संपर्क केला असता ते म्हणाले, मागील २७ वर्षांपासून आपण हा व्यवसाय करत आहोत परंतु अशी फसवणूक पहिल्यांदाच झाली.
n२०२२ साली आपण विजय चौधरी याच्याकडून औषधी घेतली. परंतु नागपूर, वर्धा आणि ठाणे येथे गोळ्या अप्रमाणित आढळल्यानंतर आपण हा स्टॉक परत घेतल्याचे त्यांनी सांगितले.
अझिथ्रोमायसीन ५०० आणि ॲमॉक्स हे अँटीबायोटिक आहे. हाडांसह इतर वेगवेगळ्या आजारांसाठी या गोळ्या दिल्या जातात परंतु अप्रमाणित आढळलेल्या गोळ्यांमध्ये स्टार्च, कॅल्शियम आणि पावडर असल्याचे समजले. त्यामुळे यांच्यापासून काहीही धोका नाही.
- डॉ. अनिल बारकूल,
ज्येष्ठ फिजिशियन, बीड
ॲझिथ्रोमायसीन ५०० ही गोळी अप्रमाणित आढळताच योग्य ती प्रक्रिया करून गुन्हा दाखल केला. यातील मुख्य आरोपी कारागृहात असल्याचे सांगण्यात आल्याने पुढील माहिती मिळत नाही.
- मनोज पैठणे, औषध निरीक्षक, बीड