रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करणार

By admin | Published: June 9, 2014 11:05 PM2014-06-09T23:05:12+5:302014-06-10T01:05:35+5:30

राज्यात महायुतीची सत्ता आल्यास महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करू व येथे मुंबईकरांसठी भव्य उद्यान उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली़

Racecourse will be deported from Mumbai | रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करणार

रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करणार

Next

उद्धव ठाकरे : फोडला प्रचाराचा नारळ
मुंबई : राज्यात महायुतीची सत्ता आल्यास महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करू व येथे मुंबईकरांसठी भव्य उद्यान उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली़
इंडियन मर्चन्टस् चेम्बरच्या वतीने विकास महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन चर्चगेट येथील मुख्य इमारतीत करण्यात आले होते़ त्यावेळी उद्धव यांनी ही घोषणा करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला़
ते म्हणाले, रेसकोर्सच्या कराराची मुदत आता संपली आहे़ त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर आम्ही हा भूखंड ताब्यात घेऊ़ येथे मुंबईकरांसाठी भव्य उद्यान उभारू . मुंबईला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी हे उद्यान एक आकर्षण ठरेल. सध्या येथे अस्तित्वात असलेला घोडे बाजार आम्ही मुंबईबाहेर हलवू़ ज्यांना शौक पूर्ण करायचे असतील ते कोठेही जाऊन करतील़ मुंबईच्या मध्यवर्ती असलेला हा सव्वा दोनशे एकर भूखंड केवळ मुंबईकरांसाठीच वापरला जाईल़ येथे टेलबलँड असल्याने उद्यान उभारताना फारसा खर्च येणार नाही़ येथे नवीन झाडे लावली जातील़ मुंबईकर येथे हक्काने येथील, असेही उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केले़
दरम्यान, रेसकार्ससोबत मुंबईतील वाहतुकीच्या कोंडीलाही उद्धव यांनी यावेळी सागरी मार्गाचा पर्याय सुचवला़ ते म्हणाले, मुंबईत इमारतींना एफएसआय मिळतो़ पण रस्त्यांना नाही़ आता मुंबईतील रस्ते वाढवणे शक्य नाही़ त्यामुळे सागरी किनार्‍यांकडून मुक्त मार्ग बांधणे हा यावर उत्तम तोडगा आहे़ या मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीची कोंडी निश्चितच कमी होईल़ मात्र हा मार्ग तयार करत असताना कोळी बांधवांच्या रोजगारावर किंवा त्यांच्या घरांवर कोणतीही गदा येणार नाही याची काळजी घेतली जाईल़
महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलताना त्यांनी शिक्षणावर अधिक जोर दिला़ ते म्हणाले, मुंबईत आम्ही व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले़ याने चारशे शाळा जोडल्या़ या चारशे शाळांतील विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकाच शिक्षकाला शिकवणे शक्य झाले़ राज्यात महायुतीची सत्ता आल्यास अशाच प्रकारचे व्हर्च्युल क्लास रूम आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू करू़ कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शहरात येऊन चांगले शिक्षण घेणे परवडत नाही़ पण या माध्यमातून आम्ही उत्तम शिक्षणाची दारे ग्रामीण भागासाठीही खुली करू़
यावेळी उद्धव यांनी उद्योजकांनाही महायुतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले़ ते म्हणाले, याआधीचे केंद्रातील सरकार हे उद्योजकांना पोषक नव्हते़ मात्र आताचे सरकार हे उद्योजकांना पाठबळ देणारे आहे़ महाराष्ट्रातही महायुतीची सत्ता आल्यास आम्ही उद्योजकांना नक्कीच सहकार्य करू़ कारण आमचे सरकार हे आमचे नसून, आपले सरकार असणार आहे़ तेव्हा उद्योजकांनाही महायुतीला तेवढेच सहकार्य करावे़ कारण माझा उद्योगांना विरोध नाही़
मी मुख्यमंत्री व्हावे, अशी तुमची असेल़ पण आता मी याबाबत काहीच बोलत नाही़ केवळ तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो, असेही उद्धव यांनी उद्योजकांना सांगितले़
यावेळी उद्धव यांनी सत्ता आल्यानंतर एक लाख पोलीस भरती, जलदगती न्यायालये, ग्राहक हिताचे रक्षण, २५ हजार मेगावॉट वीज उत्पादन अशा घोषणा केल्या़

जैतापूरला विरोध कायम
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला आमचा विरोध असून तो नवनिर्वाचीत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कळविण्यात आला आहे़ त्यांनीही या प्रकरणाचा आढावा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केल्याचे उद्धव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़

 

Web Title: Racecourse will be deported from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.