प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By Admin | Updated: May 30, 2014 01:07 IST2014-05-30T01:07:49+5:302014-05-30T01:07:49+5:30

खासगी बसमध्ये प्रवास करीत असताना गाडीला आग लागल्यास ती विझविण्याची कुठलीच यंत्रणा राहात नाही. याशिवाय आपत्कालीन दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे, त्याचा वापर कसा करावा किंवा

The question of the safety of the passengers on the anagram | प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

‘बर्निंग’ बस : तीन वर्षांत तीन मोठय़ा घटना
सुमेध वाघमारे  - नागपूर
खासगी बसमध्ये प्रवास करीत असताना गाडीला आग लागल्यास ती विझविण्याची कुठलीच  यंत्रणा राहात नाही. याशिवाय आपत्कालीन दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे, त्याचा वापर कसा  करावा किंवा ज्या वाहनांमध्ये आपत्कालीन दरवाजाऐवजी ब्रेकेबल काच असेल तर ती  फोडण्यासाठी लागणारी हातोडी कोणत्या ठिकाणी आहे, याची माहिती प्रवाशांना दिली जात नाही.  यामुळे आपत्कालीन स्थितीत सुखरूप बाहेर पडणे सहज शक्य असले तरी अनेकांना मृत्यूला  समोरे जावे लागते. गुरुवारी तळेगाव मार्गावर झालेल्या घटनेतून पुन्हा एकदा हे धक्कादायक सत्य  उजेडात आले आहे.
‘बर्निंंग’ बसेसच्या घटनेवर नजर टाकल्यास, २0१२ मध्ये चिखली, मेहकर, बुलडाणा मार्गावर  दोन खासगी बसची समोरासमोर टक्कर झाली. यात बसला लागलेल्या आगीत सुमारे १५ च्या वर  जणांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर २0१३ मध्ये बेंगळुरूहून हैदराबादकडे जाणार्‍या व्होल्वो बसमध्ये  आग लागली. यात ४५ प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेच्या १५ दिवसानंतर नोव्हेंबर  २0१३ मध्ये कर्नाटकातील हवेरी जिल्ह्यात बेंगळुरूहून मुंबईकडे येणार्‍या व्हाल्वो बसमध्ये आग  लागली. सात प्रवाशांचा मृत्यू तर ४0 प्रवासी होरपळले. मागील तीन वर्षातील या तीन मोठय़ा  घटना, मात्र यानंतरही खासगी बसचालक आपत्कालीन स्थितीची माहिती देण्यास उदासीन  असल्यानेच गुरुवारी चौथी मोठी घटना घडल्याचे बोलले जात  आहे. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव  येथे एका खाजगी बसला अचानक आग लागली. या आगीत पाच जणाना आपला जीव गमवावा  लागला, तर १५ प्रवासी जखमी झाले.
आपत्कालीन दरवाजाचा वापरच झाला नाही
 प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरच्या तपासणी चमूने आज झालेल्या  घटनास्थळाला भेट दिली. ‘लोकमत’ला प्राथमिक माहिती देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विजय चव्हाण म्हणाले, ही ‘टू बाय वन’ स्लिपर कोच बस होती. बसमध्ये वातानुकूलित यंत्र  बसविण्यात आले होते. बसच्या मागून दुसर्‍या आसन व्यवस्थेपासून आगीला सुरुवात झाली  असावी असा अंदाज आहे. सकाळची वेळ असल्याने प्रवासी झोपेत होते. अचानक आगीचा  भडका उडाला. खडबडून जागे झालेले सर्वच प्रवासी बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. यातील  बहुसंख्य प्रवासी समोरच्या दारातून तर काही खिडक्यांमधून बाहेर पडले. मात्र यात आपत्कालीन  दरवाजाचा वापर झाला नसल्याचे दिसून येते. या दरवाजाचाही वापर झाला असता तर जीवहानी  झाली नसती असा अंदाज आहे.
बसमध्ये ‘पब्लिक अँड्रेसेस सिस्टिम’ महत्त्वाची
  आरटीओ, शहर कार्यालयाने डिसेंबर २0१३ मध्ये सर्व खासगी बसचालकांना ‘पब्लिक अँड्रेसेस  सिस्टिम’ वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. यात बसचालकांनी प्रवास सुरू होण्यापूर्वी  आपत्कालीन दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे, त्याचा वापर कसा करावा किंवा ब्रेकेबल काच  असल्यास ते फोडण्यासाठी लागणारी हातोडी कोणत्या ठिकाणी आहे, वाहनात अग्निशमन  उपकरण कुठे आहे, त्याच्या उपयोगाचीही माहिती, शिवाय आपत्कालीन दरवाजावर रात्रीही  चमकणारे स्टिकर लावण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु अनेक खासगी बसचालक याला घेऊन  गंभीर नसल्याचे दिसून येते.
बसच्या इंधन टाक्या मध्यवर्ती भागात असाव्यात
  बेंगळुरूहून हैदराबाद मार्गावर व्हॉल्वोची इंधन टाकी फुटून ४५ जणांना आगीमध्ये प्राण गमवावे  लागले. यावर नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग आर अँड डी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टने  (एनएटीआरआयपी) एक अहवाल सादर केला होता. ज्यामध्ये इंधन टाकी बसच्या बाजूला  बसविण्याऐवजी मध्यवर्ती भागात बसवावी, यावर भर दिला आहे. मात्र, याकडेही अद्याप कुणाचेच  लक्ष नाही.
काचा सहज फुटणार्‍या हव्यात
आपत्कालीन काचा किंवा बसच्या सर्वच काचा हातोडीने सहज व लवकर फुटणार्‍या असाव्यात.  ज्यामुळे आपत्कालीनप्रसंगी प्रवाशांना आपला जीव वाचवता येईल, अशा सूचनाही  एनएटीआरआयपीने आपल्या अहवालातून दिल्या आहेत. परंतु उपाययोजना नाहीत.
प्रशिक्षणाचाही अभाव
शहरातील खासगी किंवा शासकीय बससेवेमधील कर्मचार्‍यांना आपत्कालीन प्रसंगी काय करावे,  याचे प्रशिक्षणच दिले जात नाही यामुळे प्राणहानीची संख्या वाढते. यासाठी सर्व बसचालकांना  आणि वाहकांना आपत्कालीनप्रसंगी देण्यात येणारे विशेष प्रशिक्षण सक्तीचे करणे आवश्यक झाले  आहे.
बसला आग लवकर घेरते
बसचा विशेषत: व्होल्वोचा संपूर्ण साचा प्लायवूडचा व त्यावर व्हेनिलचा थर दिलेला असतो.
त्यामुळे बसला आग लवकर घेरते. व्हेनिल हा एक ज्वालाग्रही पदार्थ असून तोच व्होल्वो बसमध्ये  वापरला जात आहे. बसच्या हायड्रॉलिक्समधून इंधन गळती होऊन ती हिट कल्वर्टमध्ये जाऊन  पोहोचते व आगीची ठिणगी उडून प्रथम इंधन टाकीचा स्फोट होतो व आग प्लायवूड व व्हेनिलमुळे  जलदरीत्या पसरते, असा निष्कर्ष एनएटीआरआयपीने काढला आहे.
प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी व्हावी
 खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून गर्दीचा हंगामात प्रवाशांकडून दुप्पट तिकीट आकारले जाते. मात्र,  घेतलेल्या पैशाच्या तुलनेत सुविधा दिल्या जात नाहीत. बसमध्ये प्रवासी घेऊन जाणारे सामान  कधीही तपासल्या जात नाही. अनेकवेळा रॉकेल, पेट्रोल, गॅस घेऊन जाणारे प्रवासी बसमध्ये  पहायला मिळतात. परंतु यांना हटकण्याची अथवा अडवण्याची तसदी कोणताही कर्मचारी घेताना  दिसत नाही.
 

Web Title: The question of the safety of the passengers on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.