पूल खचला तरी पीडब्ल्यूडी झोपेतच!
By Admin | Updated: November 10, 2014 04:16 IST2014-11-10T04:16:32+5:302014-11-10T04:16:32+5:30
आपेगाव व गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्रीचा २००२ मध्ये बांधलेला पूल खचण्यामागे केवळ वाळू उपसा हेच एकमेव कारण असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले

पूल खचला तरी पीडब्ल्यूडी झोपेतच!
संजय जाधव, पैठण
आपेगाव व गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्रीचा २००२ मध्ये बांधलेला पूल खचण्यामागे केवळ वाळू उपसा हेच एकमेव कारण असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पुलाच्या पायाखाली बेसुमार वाळू उपसा होत असताना या विभागाने महसूल किंवा पोलीस खात्याला साधे पत्र लिहून हे थांबविण्याबाबत कळविलेले नाही. यामुळे वाळू उपशाला महसूल, पोलीस आणि आता बांधकाम विभागाचेही अभय होते, असे उघड झाले आहे.
शनिवारी पैठण तालुक्यातील आपेगाव व गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या दोन गावांना जोडणारा २९० मीटर लांबीचा गोदावरी नदीवरील पूल अचानक खचला होता.
यानंतर गावकऱ्यांनी वेळीच वाहतूक बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली. रविवारी संध्याकाळी सात वाजता अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यू. के. आहेर, उपविभागीय अभियंता शेगोकार, शाखा अभियंता बी.बी. जायभाये आदींनी भेट देऊन पाहणी केली. तसेच आपेगाव-कुरणपिंप्री पुलाची तपासणी करण्यासाठी सोमवार १० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तज्ज्ञ पथक येणार असल्याचे उपविभागीय अभियंता एन.बी. चौरे यांनी सांगितले. पुलावरील वाहतूक दुसऱ्या दिवशीही बंद होती. वाहतुकीच्या पर्यायी व्यवस्थेबाबत वरिष्ठ स्तरावर सोमवारी निर्णय घेण्यात येईल, असेही चौरे म्हणाले. या प्रकारामुळे प्रशासनातील लालफितीचा कारभारच चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.