पक्षी स्थलांतराचे कोडे अद्याप न उलगडलेले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 02:36 AM2019-11-19T02:36:21+5:302019-11-19T11:11:14+5:30

मागोवा घेण्याचे काम सुरू; ‘पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी’ यावर आंतरराष्ट्रीय परिषद

The puzzle of bird migration is still unknown! | पक्षी स्थलांतराचे कोडे अद्याप न उलगडलेले!

पक्षी स्थलांतराचे कोडे अद्याप न उलगडलेले!

googlenewsNext

लोणावळा : पक्ष्यांचे स्थलांतर अद्यापही न उलगडलेले कोडे आहे, असे मत बर्ड लाइफ इंटरनॅशनलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पँट्रीशिया झुरीटा यांनी व्यक्त केले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे लोणावळा येथे १८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान ‘पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी या परिषदेचे उद्घाटन झुरीटा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी त्या बोलत होत्या. पक्ष्यांच्या जीवनातील स्थलांतर हा अत्यंत अविभाज्य भाग असून, पक्ष्यांच्या स्थलातराच्या प्रश्नांचा मागोवा घेण्याचे काम जगभरात सुरू झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.

आंतरराष्ट्रीय परिषदेच्या मंचावर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष होमी खुसरोखान, संचालक डॉ. दीपक आपटे उपस्थित होते. या परिषदेला केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय, राज्य शासन व मन्ग्रोव्ह फाउंडेशन यांचे सहकार्य मिळाले आहे.

पँट्रीशिया झुरीटा या वेळी म्हणाल्या, पक्ष्यांच्या जीवनातील स्थलांतर हा अत्यंत अविभाज्य भाग आहे. याबाबतचे तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. पक्ष्यांंचे उड्डाणमार्ग समजू लागले आहेत. पण आर्क्टिक टर्नसारखा शंभर ग्रॅम वजनाचा पक्षी १९ हजार मैलांचे अंतर पार करतो तेव्हा थक्क होण्यास होते. हे तो कसे करतो, कशासाठी करतो यासह अनेक प्रश्नांचा मागोवा घेण्याचे काम जगभरात सुरू आहे. समृद्ध पाणथळीबाबत बोलताना त्या म्हटल्या की, या जागा संपन्न पर्यावरणाचे द्योतक आहे.

डॉ. दीपक आपटे म्हणाले, पक्षी स्थलांतर अभ्यासाची बीएनएचएसला नऊ दशकांची परंपरा आहे. या विषयावर दीर्घ संशोधन सुरू आहे. या विषयाचे महत्त्व सरकारी पातळीवर नेऊन पाणथळ जागांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज देशातील एकोणीस राज्यांतील पाणथळींचा अभ्यास सुरू असून त्यासाठी राष्ट्रीय कृती आराखड्याची स्थापना झाली आहे. दरम्यान, होमी खुसरोखान यांनी बीएनएचएसच्या वाटचालीचा आढावा घेतला. या पाच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ४५ राष्ट्रीय व २८ आंतरराष्ट्रीय वक्ते उपस्थित आहेत. याशिवाय अनेक पक्षी अभ्यासकही येथे उपस्थित आहेत.

पाणथळी जागा अमूल्य असे वरदान!
नेदरलँड्स येथील वेटलँड इंटरनॅशनलचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी आणि पक्षी अभ्यासक डॉक्टर तेज मुंडकुर म्हणाले, समृद्ध पाणथळी जागा या स्थलांतरित पक्ष्यांसाठी अमूल्य, असे वरदान आहे. जगभरातील पाणथळी जागा बिकट अवस्थेत आहेत. सांडपाणी, पाणीप्रदूषण, वेगाने होणारे शहरीकरण, धरणे, हवामान बदलासह अनेक बाबींमुळे ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

या सर्वांचा फटका स्थलांतरित पक्ष्यांना बसत आहे. गेल्या काही वर्षांतील अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. लोकसंख्या वाढ, पक्ष्यांच्या अभ्यासाबाबत अनास्था, स्थलांतराबाबत अपुरी माहिती, दोन देशांत या विषयाबाबत समन्वय नसणे, अपुरी साधनसामग्री यावरही त्यांनी विवेचन केले.

Web Title: The puzzle of bird migration is still unknown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.