पुणेकरांचा वेग ताशी १८ किलोमीटरच

By Admin | Updated: July 31, 2016 00:51 IST2016-07-31T00:51:15+5:302016-07-31T00:51:15+5:30

वाहतूककोंडीत पुणेकरांचा प्रतिताशी वेग अवघा १८ किलोमीटर असल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आली

Pune's speed is 18 kmph | पुणेकरांचा वेग ताशी १८ किलोमीटरच

पुणेकरांचा वेग ताशी १८ किलोमीटरच


पुणे : ढेपाळलेल्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेमुळे रस्त्यावर वाढलेली वाहनांची संख्या, अपुरे आणि अरुंद रस्ते, रस्त्यांचे अर्धवट रुंदीकरण, पादचारी मार्ग नसल्याने मुख्य रस्त्यावरूनच चालणारे नागरिक या कारणांमुळे शहरातील जवळपास प्रत्येकच रस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीत पुणेकरांचा प्रतिताशी वेग अवघा १८ किलोमीटर असल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आली आहे.
यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे वाढत्या वाहनांमुळे अपघातांची संख्याही वाढलेली असून प्रत्येकी एक लाख व्यक्तीमागे ११ जणांना शहरात होणाऱ्या अपघातात आपला जीव गमवावा लागतो. म्हणजे वर्षाला सरासरी ३३० ते ३५० जणांना आपला जीव अपघातात गमवावा लागत आहे, तर वाहनांचा वेग मंदावल्याने इंधनाच्या ज्वलनामुळे हवा आणि ध्वनिप्रदूषणही दरवर्षी वाढत असल्याचे चित्र आहे. महापालिकेने तयार केलेल्या शहराच्या सर्वसमावेशक गतिशीलता आराखड्यातील माहितीच्या आधारावर पर्यावरण विभागाच्या अहवालात ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अहवालातच याबाबत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूककोंडी आणि अपुऱ्या रस्त्यांमुळे पुणेकरांच्या वाहनांचा वेग ताशी केवळ १८ किलोमीटरच असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी फोडण्यासाठी योग्य उपाययोजनेची गरज आहे.
>लाखामागे अकरा जणांचा बळी
शहरातील वाहतुकीचे तीन-तेरा वाजल्याने प्रत्येक एक लाख पुणेकरांमागे दरवर्षी ११ जणांचा बळी जात आहे. शहराची लोकसंख्या ३१ लाखांच्या घरात असल्याने जवळपास ३३० पुणेकरांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातही प्रामुख्याने पादचाऱ्यांना पदपथच नसल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. अहवालानुसार, शहरातील रस्त्यांच्या लांबीच्या तुलनेत केवळ ५३ टक्केच पदपथ आहेत.
शहरातील रस्त्यांची लांबी जवळपास २१०० किलोमीटर आहे. म्हणजेच अद्यापही एक हजार किलोमीटर रस्त्यावर पदपथ नाहीत, तर ज्या ठिकाणी पदपथ आहेत त्यांची अवस्थाही अतिशय दयनीय असून अतिक्रमणांच्या विळख्यात ते आहेत. पादचारी जीव मुठीत धरून रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहनांच्या गर्दीत पादचाऱ्यांचीही भर पडून वाहतूकव्यवस्था कोलमडत आहे.
>ढेपाळलेली
सार्वजनिक वाहतूक
शहरात पीएमपीएमएलच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविली जाते. २०१३ पर्यंत पीएमपीने सुमारे १२ लाख प्रवासी प्रवास करीत होते. गेल्या तीन वर्षांत हा आकडा घटून ९ लाखांच्या आसपास आला आहे. अपुऱ्या बसेस, चांगल्या बसेसचा अभाव, वेळापत्रकाचा अभाव, सेवा मिळत नसतानाही वाढते तिकीटदर यामुळे सर्वसामान्य पुणेकर पीएमपीला राम राम ठोकत असून दुसरीकडे खासगी वाहनांचा पर्याय निवडत आहेत.
त्यामुळे २०१३ मध्ये असलेली खासगी वाहनांची संख्या २५ लाखांवरून २०१६ मध्ये थेट ३१ लाखांच्या घरात (६ लाखांनी वाढ) पोहोचली आहे. शहरात सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यासाठी एक लाख लोकसंख्येमागे ५५ गाड्यांची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात मात्र ११ गाड्याच रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे खासगी वाहने वाढत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांचा वेग कमी झाला आहे.
>खासगी वाहनांची संख्या कमी करण्यात अपयश
शहरात दरवर्षी सरासरी दोन लाखांनी वाढणाऱ्या सार्वजनिक वाहनांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने विनायंत्र वाहतुकीच्या फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे. त्यात प्रामुख्याने कामाच्या ठिकाणी १५ मिनिटांत जाण्यासाठी बस उपलब्ध असणे, सायकल वापर वाढविणे, कमी अंतरासाठी पदपथ वापरणे अशा विनायंत्र वाहनांच्या फेऱ्या वाढविणे आवश्यक आहे.
मात्र, या अहवालानुसार, शहरातील एकूण वाहनांच्या फेऱ्यांच्या तुलनेत सार्वजनिक वाहनांच्या फेऱ्या अवघ्या २६ टक्के आहेत. त्या किमान ८० टक्के असणे आवश्यक आहे. त्यासाठी रुंदीकरण झालेल्या रस्त्यावर महापालिकेने सायकल ट्रॅकही केले असून एकूण रस्त्यांच्या तुलनेत त्यांची संख्या अवघी ४.८ टक्के आहे. प्रत्यक्षात ती १०० टक्के असणे आवश्यक आहे, तरच खासगी वाहनांची वाढती संख्या रोखणे महापालिकेस शक्य आहे.
>रस्त्यांची अपुरी क्षमता, आणखी एक हजार किलोमीटरचे रस्ते विकसित करणे गरजेचे
शहरातील वाहनांची वाढलेली संख्या पाहता शहरातील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडत आहेत. पर्यावरण अहवालातील आकडेवारीनुसार, रस्त्यांच्या क्षमतेनुसार ०.० असणे आवश्यक असताना शहरातील सद्य:स्थिती पाहता ते १.०४ आहे. म्हणजेच महापालिकेस पुढील काही वर्षांत आणखी एक हजार किलोमीटरचे नवीन रस्ते विकसित करावे लागणार आहेत. शहराचा विस्तार २५१ चौरस किलोमीटरपर्यंत असला तरी शहरात २१०० किलोमीटरचे रस्ते महापालिकेस विकसित करता आलेले आहेत.
तर नवीन रस्ते ज्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आले आहेत
त्या ठिकाणी अतिक्रमणे झाल्याने तसेच जागा ताब्यात
घेण्यास बिलंब होत असल्याने दरवर्षी केवळ ५ ते १० किलोमीटरचे नवीन रस्ते महापालिका तयार करीत आहे. हा वेग अतिशय कमी आहे. त्यातच वाहनांची संख्या वाढल्याने महापालिकेने हाती घेतलेले रस्त्यांचे रुंदीकरणाचे कामही अर्धवट झाले आहे, तर ज्या ठिकाणी रुंदीकरण झाले आहे. ते रस्ते अतिक्रमणांनी गिळंकृत केले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीचा वेग मंदावण्यावर झाला आहे.

Web Title: Pune's speed is 18 kmph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.