पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी
By Admin | Updated: August 16, 2014 23:25 IST2014-08-16T23:25:29+5:302014-08-16T23:25:29+5:30
महापालिकेचे महापौरपद खुल्या गटासाठी राखीव झाल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील महापौरपदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी
>पुणो : महापालिकेचे महापौरपद खुल्या गटासाठी राखीव झाल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील महापौरपदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. महिला व इतर वर्गासाठी स्वतंत्र आरक्षण असल्याने यंदा खुल्या गटातून पुरुष सदस्याची महापौरपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस वतरुळातून व्यक्त होत आहे. त्यातच विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.
राज्यातील महापालिकांच्या महापौरांचा कार्यकाल अडीच वर्षाचा आहे. येत्या 15 सप्टेंबरला विद्यमान महापौरांचा कार्यकाल पूर्ण होणार असल्याने आज मुंबई येथे नवीन आरक्षणासाठी लॉटरी काढण्यात आली. त्यामध्ये पुणो महापालिकेचे महापौरपद खुल्या गटासाठी जाहीर करण्यात आले आहे. महापालिकेमध्ये मागील साडेसात वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून चार सदस्यांना हे पद भूषविण्याची संधी मिळाली आहे. त्यामध्ये राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर आणि विद्यमान महापौर चंचला कोद्रे यांना महापौरपद देण्यात आले.
पक्षाकडून ज्येष्ठ सदस्य बाबुराव चांदेरे, दीपक बोडके, विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, सुभाष जगताप, बापूराव कण्रे गुरुजी, दिलीप बराटे, चेतन तुपे यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. कण्रे गुरुजी हे विद्यमान स्थायी समितीचे अध्यक्ष असून जगताप मागील तीन वर्षापासून सभागृह नेते आहेत. तसेच, जगताप आणि बराटे हे दोघेही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित असल्यास त्यांची नावे मागे पडणार असल्याचे बोलले जात आहे; तर विधानसभेच्या जागा राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केल्यास या इच्छुकांपैकी एकास संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवाय, ज्या इच्छुकाचे विधानसभेचे तिकीट कापले जाईल, त्याची नाराजी दूर करण्यासाठी महापौरपद दिले जाईल.
तुपे हे हडपसर मतदारसंघातील असून, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी हडपसरला तीन वेळा महापौरपद दिले आहे. यापूर्वीच्या दोन्ही महापौर या हडपसरच्याच आहेत. त्यामुळे तुपे यांचे नावही मागे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाबुराव चांदेरे, विशाल तांबे, दीपक बोडके आणि दत्ता धनकवडे या चार जणांमध्ये चुरस पाहायला मिळेल, तर खुल्या गटातून निवडून आल्याने जगताप यांनीही या पदासाठी आपली दावेदारी जाहीर केलेली आहे. (प्रतिनिधी)
राजकीय गणितेही बदलणार
पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 सदस्य असून, त्यात 16 सदस्य खुल्या गटातून विजयी झाले आहेत. त्यामुळे खुल्या गटातून पुरुष सदस्याला महापौरपदाची संधी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीतून मूळ धरू लागली आहे. त्यामुळे या निवडीवर आगामी निवडणुकीची गणितेही बदलण्याची शक्यता आहे.