पुण्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:27 IST2016-08-06T00:27:11+5:302016-08-06T00:27:11+5:30
मुसळधार पावसाने शुक्रवारी शहराला झोडपले. सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले

पुण्याला पावसाने झोडपले
पुणे : मुसळधार पावसाने शुक्रवारी शहराला झोडपले. सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. जोरदार पावसामुळे मुख्य रस्त्यांसह विविध भागांमध्ये पुणेकरांना
वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वेधशाळेकडे शहरात ४३ मिमी, तर लोहगावला २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शहरात जोरदार पर्जन्यवृष्टी होऊनही पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अद्याप न झाल्याने पुणेकरांंमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही दिवसांपासून शहरात पावसाचे थैमान सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहराचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत. गुरुवारी अनेक दिवसांनंतर नागरिकांना सूर्यदर्शन घडले तरी ऊन-पावसाचा खेळ सुरूच होता. मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. अधूनमधून विश्रांती घेत पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. दुपारनंतर वहातूक काहीशी मंदावली होती; परंतु २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. सायंकाळनंतर अनेक भागांत वाहतूककोंडीचे चित्र होते. खडकवासला धरणातून विसर्ग केल्याने अनेक सोसायट्यांमध्ये पुन्हा पाणी शिरले.