पुणे - सिंहगड रस्त्यावरील नदीजवळील सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी
By Admin | Updated: August 3, 2016 19:47 IST2016-08-03T17:11:20+5:302016-08-03T19:47:00+5:30
खडकवासला धरणातून तब्बल ३१ हजार क्युसेक्सने पाणी सोडले जात असल्याने मुठा नदीला मोठा पूर आला आहे.

पुणे - सिंहगड रस्त्यावरील नदीजवळील सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३ - खडकवासला धरणातून तब्बल ३१ हजार क्युसेक्सने पाणी सोडले जात असल्याने मुठा नदीला मोठा पूर आला आहे. सिंहगड रस्त्यावरील नदीपात्रालगतच्या सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अग्निशमन दलाच्या वतीने रहिवाशांना घराबाहेर काढण्यासाठी रेस्क्यु आॅपरेशन सुरू करण्यात आले आहे. पानशेत धरणही पूर्ण भरल्याने येत्या काही तासांत हा विसर्ग ५० हजार क्युसेक्सवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुराचा धोका आणखी वाढणार आहे.
धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी सकाळपासून विसर्गाला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला १० हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात होते. परंतु, खडकवासला आणि पानशेत धरणाच्य पाणलोट क्षेत्रात संततधार सुरूच आहे. परिसरातील ओढ्या-नाल्यांना पूर आले असून मोठ्या प्रमाणात पाणी धरणांमध्ये येत आहे. पूरनियंत्रणासाठी पाटबंधारे विभाागाने टप्या-टप्याने विसर्गामध्ये वाढ केली. दुपारी चार वाजल्यापासून ३१, ६०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर खडकवासला धरणाच्या खालील बाजूस असलेल्या ओढ्या-नाल्यांचे पाणीही नदीमध्ये येत आहे. पानशेत धरणही भरल्याने त्यातूनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडकवासला धरण मोकळे करण्यासाठी आताचा विसर्ग ५० हजार क्युसेक्सवर जाणार आहे.
हरित न्यायाधिकरणच्या आदेशानंतर मुठा नदीपात्रात बांधलेली संरक्षक भिंत पाडून टाकण्यात आली आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर नदीपात्रात असलेल्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे. नदीपात्रात टाकलेला राडारोडा, अतिक्रमणे यामुळे साधारणत: ४० हजार क्युसेक्सनंतरच पूराचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे अनेक सोसायट्या पाण्याखाली जाण्याची भीती आहे. अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू केले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.