पुण्यातील यवतमध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दोन गटांमध्ये शुक्रवारी हिंसाचार उसळला. मात्र, त्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी ५०० हून अधिक लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून १७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यांच्यावर जाळपोळ आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "यवतमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दुर्दैवाने, बाहेरून आलेले लोक तिथे अशा गोष्टी करत आहेत. असे अनेक व्यक्ती आहेत, जे विविध ठिकाणी जाऊन लोकांना घाबरवतात आणि चिथावणीखोर वक्तव्य करतात. ज्यामुळे शहरात अशा अनेक घटना घडल्या आहेत, आताही घडत आहेत. परंतु, हा प्रकार महाराष्ट्राच्या हिताचा नाही. पुण्यातील गुंडगिरीमुळे गुंतवणुकीचा अभाव निर्माण झाला, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. राज्यात अशीच परिस्थिती राहिली तर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही. ही मोठी चिंतेची बाब आहे."
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावर एका तरुणाने वादग्रस्त पोस्ट केल्याने दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि हिंसाचार उसळला. या पार्श्वभूमीवर यवतमधील बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली, तसेच काही ठिकाणी घरांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती कोल्हापूरचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
या हिंचाचारात गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संतप्त जमावाने मोटारसायकल पेटवून दिली. तसेच काही समाजकंटकांनी दोन कारच्या काचा फोडल्या, बेकरीचे नुकसान केले आणि एका धार्मिक स्थळावर तोडफोड केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत आणि घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली असून तो मूळचा नांदेड येथील असल्याचे सांगण्यात जात आहे. याप्रकरणी फडणवीस यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.