Pramod Kondhare BJP Pune Chitra Wagh: महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित पुणे दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून कोंढरे यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. याचदरम्यान, भाजपाच्यामहिला आमदार चित्रा वाघ यांनीही कोंढरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
"आज अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी घटना कानावर आली. प्रमोद विठ्ठल कोंढरे, जो भारतीय जनता पक्षाचा पुणे शहराचा पदाधिकारी होता त्याने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला. आताच यासंदर्भात मी पुण्याचे भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे जी यांच्याकडून माहीती घेतली असता संबंधित पदाधिकाऱ्याला तात्काळ पदमुक्त केल्याची माहीती त्यांनी दिली इतकच नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आली आहे. अर्थात, आम्ही इतक्यावरच थांबणार नाही त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी पाठपुरावा करणार आहे," असे चित्रा वाघ यांनी ट्विट केले.
"भारतीय जनता पक्ष हा संविधान, कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत, महिला सशक्ततेविरुद्ध मग तो आमच्या पक्षाचा का असेना वागणाऱ्याला कधीही माफ केले जाणार नाही," असेही वाघ यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्यात कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले. कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकारी यांना पाठीमागून धक्का दिला. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर कोंढणे यांच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण पूर्ण पारदर्शकतेने आणि कायद्यानुसार हाताळले जाईल, असे आश्वासन एका पोलीस अधिकाऱ्याने दिले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.