'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 06:04 IST2025-04-23T06:03:54+5:302025-04-23T06:04:31+5:30

यंदा पहिल्या पाच यशस्वी उमेदवारांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

Pune Archit Dongre ranks third in UPSC; 95 students from the state achieved success | 'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

नवी दिल्ली/पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या २०२४ मधील परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला. यावेळी पहिल्या दोन स्थानांवर मुलींनी बाजी मारली आहे. प्रयागराजची शक्ती दुबे ही अव्वल ठरली आहे, तर हरियाणाच्या हर्षिता गोयलने दुसरे स्थान पटकावले आहे. तर पुण्याच्या अर्चित डोंगरेने तिसरे स्थान मिळविले आहे. एकूण १००९ उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत समाविष्ट आहेत. त्यापैकी ९५ विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत.

यंदा पहिल्या पाच यशस्वी उमेदवारांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पहिल्या २५ उमेदवारांमध्ये ११ महिला आणि १४ पुरुषांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये ४५ दिव्यांग व्यक्तींचाही समावेश आहे, ज्यामध्ये १२ अस्थिव्यंगिकदृष्ट्या अपंग, आठ दृष्टिहीन, १६ श्रवणदोष आणि नऊ बहुअपंगत्व असलेले उमेदवार आहेत. यूपीएससीने म्हटले आहे की, शिफारस केलेल्या २४१ उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती ठेवण्यात आली आहे आणि एका उमेदवाराचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

टॉप १० यशस्वी उमेदवारांत पाच मुलींचा समावेश : १. शक्ति दुबे, २. हर्षिता गोयल, ३. अर्चित पराग डोंगरे, ४. मार्गी चिराग शाह, ५. आकाश गर्ग, ६. कोमल पुनिया, ७. आयुषी बंसल, ८. राज कृष्ण झा, ९. आदित्य विक्रम अग्रवाल, १०. मयंक त्रिपाठी

शक्ती दुबे : तिसऱ्या प्रयत्नात मिळाले यश
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील शक्ती दुबे टॉपर आहे. अलाहाबाद तिने विद्यापीठातून बी.एससी. केले. त्यात ती सुवर्णपदक विजेती होती. त्यानंतर २०१८ मध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी केले. यामध्येही ती सुवर्णपदक विजेती होती. नंतर ती स्पर्धा परीक्षांकडे वळली. यूपीएससीत राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध हे पर्यायी विषय घेतले. गेल्या वर्षी ती मुलाखतीपर्यंत पोहोचली होती. मात्र, १२ गुणांनी कट ऑफपासून दूर राहिली. तिसऱ्या प्रयत्नात तिने हे यश मिळविले.

हर्षिता गोयल : सीए झाली; समाजसेवाही
हर्षिता मूळची हरियाणातील हिसारची रहिवासी असून, गेल्या अनेक वर्षापासून गुजरातमधील वडोदरा येथे वास्तव्यास आहे. तिने आपले शालेय शिक्षण वडोदरा येथून केले. यानंतर त्यांनी वडोदरा येथील महाराज सयाजी राव विद्यापीठातून बी. कॉमचे शिक्षण घेतले. हर्षिता सीए आहे. तिने यॅलेसेमिया व कर्करोगग्रस्त मुलांसाठी अहमदाबाद येथील बिलीफ फाउंडेशनबरोबर काम केले आहे. हर्षिता सीए आहे. तिचे पर्यायी विषय आंतरराष्ट्रीय संबंध व राज्यशास्त्र होते.

अचिंत डोंगरे : तत्त्वज्ञान पर्यायी विषय घेतला
पुण्याचा रहिवासी असलेला २६ वर्षीय अर्चित हा एक अभियंता आहे. त्याने तामिळनाडूतील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) मधून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी) पदवी घेतली आहे. अर्चितने सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत तत्वज्ञान हा पर्यायी विषय घेऊन तिसरा क्रमांक पटकावला. तो तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. ध्यानधारणा, स्क्वॅश खेळणे हे त्याचे छंद आहेत.

Web Title: Pune Archit Dongre ranks third in UPSC; 95 students from the state achieved success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.