ऊसदरप्रश्नी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी
By Admin | Updated: January 14, 2015 04:03 IST2015-01-14T04:03:53+5:302015-01-14T04:03:53+5:30
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे भाव देण्याचा प्रश्न गुंतागुंतीचा न करता परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी इच्छाशक्ती दाखविली पाहिजे

ऊसदरप्रश्नी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी
लोणी (अहमदनगर) : ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपीप्रमाणे भाव देण्याचा प्रश्न गुंतागुंतीचा न करता परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने मार्ग काढण्यासाठी इच्छाशक्ती दाखविली पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे शिष्टमंडळ नेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना तोडफोड करून जनतेचे लक्ष विचलीत करून प्रश्नाचे गांभीर्य कमी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मंगळवारी सकाळी विखे यांनी ऊसदराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
चर्चेचा तपशील देताना ते म्हणाले, की या प्रश्नावर सरकारने पॅकेज जाहीर करावे आणि साखर कारखान्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे, या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळाला पाहिजे, याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र यासाठी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी. सवलती मिळाल्यामुळे सहकारी साखर कारखाने चांगला भाव देण्यासाठी पुढाकार घेऊ शकले.
मात्र आज सत्तेतील भागीदार पक्ष सरकारवर दबाव आणण्याऐवजी कारखान्यांवर कारवाईची आश्चर्यकारक भूमिका घेताना दिसतात. सत्तेतील भागीदारांनी पंढरपूर ते वर्षा बंगला असा मोर्चा काढला असता तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते, अशी टीकाही त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर केली. (प्रतिनिधी)