महानिर्मितीचा दरमान्यतेसाठी प्रस्ताव
By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:45+5:302016-04-03T03:50:45+5:30
महानिर्मितीने वीज नियामक आयोगाकडे २०१६-१७ या वित्तीय वर्षासाठी प्रतियुनिट ३ रुपये ५२ पैसे इतका वीजदर प्रस्तावित केला आहे. त्यामुळे २०१५-१६च्या तुलनेत वीजदरात

महानिर्मितीचा दरमान्यतेसाठी प्रस्ताव
मुंबई : महानिर्मितीने वीज नियामक आयोगाकडे २०१६-१७ या वित्तीय वर्षासाठी प्रतियुनिट ३ रुपये ५२ पैसे इतका वीजदर प्रस्तावित केला आहे. त्यामुळे २०१५-१६च्या तुलनेत वीजदरात कोणतीही लक्षणीय वाढ होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. २०१६-१७ ते २०१९-२० वर्ष या तिसऱ्या नियंत्रण कालावधीत एकूण चार वर्षांत प्रतिवर्षी टप्प्याटप्प्याने केवळ सुमारे १.५ टक्के इतकीच वीजदरवाढ होणार आहे. तर २०१९-२० साली ३ रुपये ७१ पैसे हा वीजनिर्मिती दर असणार आहे.
महानिर्मितीने आर्थिक वर्ष २०१४-१५ सालचे अंतिम समायोजन, आर्थिक वर्ष २०१५-१६ सालचे तात्पुरते समायोजन आणि आर्थिक वर्ष २०१६-१७ ते आर्थिक वर्ष २०१९-२० यासाठीच्या तिसऱ्या नियंत्रण कालावधीच्या बहुवार्षिक वीजदर मान्यतेकरिता आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.
वीज ग्राहकांना याचिकेवर हरकती नोंदवता याव्यात म्हणून यासंदर्भातील सहा प्रती संबंधितांनी माननीय सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, १३वा मजला, सेंटर क्रमांक १, वर्ल्ड टे्रड सेंटर, कफ परेड, कुलाबा या पत्त्यावर २२ एप्रिलपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महानिर्मितीने केले आहे. (प्रतिनिधी)
२६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कुलाबा येथील आयोगाच्या कार्यालयात सुनावणी होईल. हरकतीधारकांना म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाईल. २२ एप्रिलपर्यंत प्राप्त हरकती, सूचना आणि अभिप्रायाला महानिर्मितीकडून तीन दिवसांत उत्तर दिले जाईल. या उत्तरांवर आक्षेप किंवा प्रत्युत्तरे संबंधिताला सुनावणीवेळी किंवा २९ एप्रिलपर्यंत दाखल करता येतील.
२०१४-१५ आणि २०१५-१६ या सालात पाणीटंचाईमुळे परळीमधील वीजनिर्मिती पूर्णत: बाधित झाली. या काळात चंद्रपूर, भुसावळ, कोरडी येथील संचही कोळशाअभावी बंद ठेवावे लागले. उरण वायू केंद्रातही वायूचा तुटवडा होता. त्यामुळे महानिर्मितीच्या एकूण वीजनिर्मितीवर याचा परिणाम झाला.
कोरडीमधील संच क्रमांक ८
आणि उर्वरित २ संच, चंद्रपूरमधील २ नवे संच आणि परळीमधील
१ संच आगामी काही महिन्यांत कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे औष्णिक वीजनिर्मिती क्षमतेत २ हजार ५७० मेगावॅट
वाढ होईल.