विचारांची मशागत करणारा निरोप सोहळा

By Admin | Updated: May 7, 2017 04:10 IST2017-05-07T04:02:09+5:302017-05-07T04:10:56+5:30

एखाद्या प्राध्यापकासाठी सर्वांत महत्त्वाचे काय, असे विचारले तर सहज येणारे उत्तर म्हणजे शिक्षण... माध्यम शिक्षणातील दिग्गज

Promotional message saga | विचारांची मशागत करणारा निरोप सोहळा

विचारांची मशागत करणारा निरोप सोहळा

 - राहुल रनाळकर -

एखाद्या प्राध्यापकासाठी सर्वांत महत्त्वाचे काय, असे विचारले तर सहज येणारे उत्तर म्हणजे शिक्षण... माध्यम शिक्षणातील दिग्गज म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर, देशभर ओळख आहे, असे मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे नुकतेच सेवानिवृत्त झाले. प्राध्यापकासाठी व्रत असलेल्या शिक्षणाने डॉ. गव्हाणे यांचा शेवटपर्यंत पिच्छा सोडला नाही. किंबहुना डॉ. गव्हाणे यांनीच शिक्षणाचा पिच्छा पुरवला, असेच म्हणावे लागेल. एखाद्या प्राध्यापकाचा निरोप सोहळा दोन आंतरराष्ट्रीय सेमिनारचे युनिसेफच्या सहकार्याने आयोजन करून साजरा केला जातो, हे उदाहरण त्यामुळेच दुर्मीळ ठरते. सामाजिक न्याय आणि शाश्वत विकासासाठी माध्यमांची भूमिका या विषयावरील आंतरविद्याशाखीय दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि दक्षिण आशिया तसेच अरब राष्ट्रांतील माध्यमे या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवाद अशा ज्वलंत विषयावरील दोन भरगच्च कार्यक्रमांनी डॉ. गव्हाणे यांना निरोप देण्यात आला. ज्या विषयांवर विद्यार्थ्यांना आयुष्यभर सतत मार्गदर्शन केले, त्या विषयांनीच शैक्षणिक कारकिर्दीचा शेवट होण्याचा हा प्रसंग खास ठरतो. किंबहुना ही पुन्हा नव्याने सुरुवात ठरावी...

 संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी २०३० पर्यंत काही ध्येये ठरविली आहेत. संपूर्ण जगातील मानवासाठी ही ध्येये अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. ही ध्येये साध्य करण्यासाठी सामाजिक न्याय आणि माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक न्यायाची उद्दिष्टे जोपर्यंत साध्य होत नाहीत, तोवर शाश्वत विकास पूर्णपणे साधता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. या ज्वलंत विषयावर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सखोल चर्चा झाली.
सामाजिक न्याय आणि शाश्वत विकासासाठी माध्यमांची भूमिका काय असू शकते, काय आहे किंवा कशी असायला हवी, या विषयावर या परिषदेत प्रकाश टाकण्यात आला. यासह दक्षिण आशिया आणि अरब राष्ट्रांतील माध्यमे या विषयावरील परिसंवादही माध्यमांच्या भविष्यावर आणि माध्यमांची भूमिका अधिक स्पष्ट करणारा ठरला. प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या सन्मानार्थ आयोजित या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांसाठी राज्यासह, देश-विदेशातील तज्ज्ञ हिरिरीने सहभागी झाले होते.
बँकॉकच्या एशिया पॅसिफिक डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड कम्युनिकेशन सेंटरचे कार्यकारी संचालक प्रा. पीटर चेन, केनियातील नैरोबी येथील इंटरनॅशनल सेंटर आॅफ कॅपॅसिटी डेव्हलपमेंटच्या संचालिका प्रा. फेलिसिटा नुजुगुन्ना, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, बांगलादेशातील ढाका युनिव्हर्सिटीच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या माजी प्रमुख प्रा. डॉ. नसरिन गिटारिया, युनिसेफच्या चिफ फिल्ड आॅफिसर राजेश्वरी, युनिसेफच्या संवादतज्ज्ञ स्वाती मोहपात्रा, श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठातील प्रो. अजंता हापुरांचची यांची विशेष उपस्थिती होती.
प्रा. पीटर चेन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या २०३० च्या ध्येयांबाबत संक्षिप्त, परंतु अत्यंत मोलाची माहिती दिली. यात गरिबी निर्मूलनापासून, भूक निर्मूलन, बालकांमधील गरिबी, शाश्वत आर्थिक विकास, औद्योगिक आणि संशोधनात्मक विकास, शहरीकरण, महासागरांतील पर्यावरण-प्रदूषण, असमानतेचा प्रश्न, शांततापूर्ण सहजीवन या विषयांना त्यांनी स्पर्श केला. एकूण १७ महत्त्वाच्या विषयांवर संयुक्त राष्ट्र कार्यरत असल्याचे विवेचनही त्यांनी केले.
युनिसेफ सध्या महाराष्ट्रातील तळागाळात कार्यरत आहे. लहान मुले आणि महिलांसाठी अत्यंत मूलभूत स्वरूपाचे काम युनिसेफच्या माध्यमातून होत आहे. त्यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांची सुरक्षितता असल्याचे युनिसेफच्या राजेश्वरी यांनी या परिषदेत स्पष्ट केले. लहान मुले आणि महिलांच्या शाश्वत विकासाशिवाय एकूणच समाजाचा आणि देशाचा विकास शक्य नसल्याचेही म्हणणे त्यांनी मांडले. लहान मुलांना सकस आहार, विकासाची योग्य संधी, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीकामासाठी स्थलांतरित होणारा मोठा समाज महाराष्ट्रात आहे.
त्यामुळे या स्थलांतरित शेती कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. ती रोखण्याचेही शाश्वत प्रयत्न युनिसेफच्या माध्यमातून सुरू आहेत.
शाश्वत विकासावरील चर्चा आपण आता का करतोय, असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी उपस्थित केला. माध्यमेदेखील समाज आणि देशासमोरील खरे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याचीही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. दुसऱ्या महायुद्धानंतर असलेले प्रश्न आजही कायम आहेत. कोणताही प्रश्न राजकारणापासून वेगळा करून पाहता येणार नसल्याचे ते म्हणाले. ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाच्या प्रश्नांची चर्चा १९७२ नंतर सुरू झाली. क्लब आॅफ रोमच्या माध्यमातून काही प्रश्न त्यानंतरच्या काळात मांडण्यात आले होते. क्लब आॅफ रोमने मांडलेले मुद्दे अजूनही कायम आहेत.
दक्षिण आशिया आणि अरब राष्ट्रांतील ‘माध्यमे : समस्या आणि संधी’ या विषयावरील परिसंवादही अत्यंत उद्बोधक ठरला. दक्षिण आशियाई राष्ट्रांसह अरब राष्ट्रांमधील समस्या समान स्वरूपाच्या असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे महानिदेशक के.जी. सुरेश यांचीही या परिसंवादाला खास उपस्थिती होती. गरिबीसह, बेकारी, जातीय-वांशिक तणाव, दहशतवाद या ज्वलंत प्रश्नांना दक्षिण आशियाई देशांना तोंड द्यावे लागत असल्यावर विचारमंथन झाले. विविधतेत एकता साधण्याचे कसब संपूर्ण दक्षिण आशियाई देशांना साधावे लागणार आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही. या भागातील माध्यमांनी ज्वलंत विषयाचे प्राधान्यक्रम ठरवायला हवेत.
मूळ प्रश्नांना अजूनही माध्यमांकडून स्पर्श होताना दिसत नाही. आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट विकास विभागाच्या कोर्स डायरेक्टर प्रा. डॉ. निकिता सूद यांनीही माध्यमांच्या भूमिकांविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. विकासाची फूटपट्टी लावताना मानवाचा सर्वांगीण विकास कितपत साध्य होतो, याचा विचार सर्वाधिक महत्त्वाचा आणि मूलगामी ठरतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. विकासाचे खरे मुद्दे अनेकदा बाजूला ठेवले जातात. गुन्हेगारी आणि राजकीय बातम्यांनी सध्या माध्यमांना ग्रासले आहे.
जगभर माध्यमांची भूमिका सध्या कमालीची महत्त्वाची बनली आहे. विकासाची संकल्पना काही प्रमाणात का होईना मागे पडत चालली आहे. आता शाश्वत विकास साधायला हवा, असा सूरही व्यक्त होतो. शेवटी शाश्वत विकास म्हणजे काय, तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि तोही शाश्वत स्वरूपात पोहोचायला हवा, ही आताची गरज बनली आहे. पण सामाजिक न्यायाचे ध्येय साध्य केल्याशिवाय शाश्वत विकास साधणे शक्य नाही, हेदेखील वास्तव आहे. सामाजिक न्याय म्हणजेदेखील सामाजिक प्रश्नांवरचा न्याय, अशी संकुचित व्याख्या करता येणार नाही. समाजातील सर्व घटकांना विकासाच्या समान संधी सामाजिक न्यायामध्ये अपेक्षित आहेत. स्वातंत्र्य आणि समतेचा समन्वय म्हणजे न्याय. तथापि, यात अमर्यादित स्वातंत्र्य आणि अमर्यादित समता अपेक्षित नाही. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही माध्यमांची भूमिका अत्यंत प्रभावी आहे.
माध्यम क्षेत्रांत सध्यापर्यंत पाश्चिमात्य जगतातील मॉडेल प्रचलित आहे. तथापि, आशियाच्या समस्या सोडवायच्या झाल्यास आशियातील माध्यमांना आशियातील पातळीवरील स्वतंत्र मॉडेलची निर्मिती करावी लागणार असल्यावर सर्वच मान्यवरांचे एकमत झाले. विचारमंथन करून, विचारांना चालना देऊन, माध्यमे कोणत्या दिशेने जाणार याची जाणीव करून देणारा हा तीन दिवसीय निरोप सोहळा चिरस्मरणीय आणि खराखुरा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ठरला.
(लेखक मुंबई आवृत्तीत शहर संपादक आहेत.)
 

Web Title: Promotional message saga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.