खर्डामधील घटनेचा संस्था-संघटनांकडून निषेध
By Admin | Updated: May 8, 2014 22:28 IST2014-05-08T20:15:17+5:302014-05-08T22:28:05+5:30
अहमदनगर जिल्हयातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावामध्ये घडलेल्या नितीन आगे खून प्रकरणाचा शहरातील विविध संस्था-संघटनांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.

खर्डामधील घटनेचा संस्था-संघटनांकडून निषेध
पुणे : अहमदनगर जिल्हयातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावामध्ये घडलेल्या नितीन आगे खून प्रकरणाचा शहरातील विविध संस्था-संघटनांच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करून असे प्रकार घडणार नाहीत अशी दक्षता घेण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
मातंग एकता आंदोलनाच्यावतीने दलित प्रतिबंधक कायदा सक्षम करून अत्याचार रोखण्याची मागणी आमदार रमेश बागवे यांनी केली आहे. आगे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकार्यांना भेटून बागवे यांच्यावतीने निवदेन देण्यात येणार आहेत.
लहुजी महासंघ संघटनेने याप्रकरणाचा निषेध करून अहमदनगर जिल्हा दलित अन्यायग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करावा तसेच तंटामुक्ती गाव योजनेतून दलितांना वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वैराळ, अनिल हातागळे, सनी शिंदे, शिवा साळवे, बाळासाहेब मोहिते यांनी ही मागणी केली आहे.
बहुजन परिवर्तन लढयाच्यावतीने रामदेवबाबा यांच्यावर ॲट्रासिटी कायद्यानुसार कारवाई करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. रामदेवबाबा यांनी त्यांच्या वक्तव्यातून दलितांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्ष फिरोज शेख, महेंद्र यादव, सुरेश लोखंडे, शाम पासी, संतोष सागवेकर, राजेश सोनकांबळे यांनी केली आहे.
........................