शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांची घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 05:26 IST2019-12-18T05:26:37+5:302019-12-18T05:26:46+5:30
‘बांधावर जाऊन दिलेले आश्वासन पूर्ण करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांची घोषणाबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही आज विरोधकांनी गाजविला. कामकाजानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता अधिवेशनाला प्रारंभ होणार होता. त्यापूर्वी भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून सामनातील वृत्ताचा फलक झळकावीत जोरदार नारेबाजी आणि निदर्शने केली. ‘बांधावर जाऊन दिलेले आश्वासन पूर्ण करा, नाही तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृृत्वात भाजपा आमदारांनी शिवसेनेच्या मुखपत्रातील बातमीचा बॅनर झळकवीत आंदोलन केले. मुख्यमंत्री पदावर येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांच्या बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर आपल्या वचननाम्यातही या आश्वासनाचा उल्लेख केला होता. आता स्वत: तेच मुख्यमंत्री असल्याने त्यांनी केंद्राच्या भरवशावर न राहता शेतकºयांना दिलेला शब्द पूर्ण करावा, अशी मागणी करीत हे आंदोलन करण्यात आले.
शेतकºयांना न्याय मिळालाच पाहिजे, हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, दिलेले आश्वासन पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा सुमारे २० मिनिटे चालल्या. गोंधळाच्या वातावरणातच घोषणाबाजी करीत सदस्य दोन्ही सभागृहात दाखल झाले.