पालिका रुग्णालयांच्या सफाईचे खासगीकरण
By Admin | Updated: August 26, 2016 06:54 IST2016-08-26T06:54:30+5:302016-08-26T06:54:30+5:30
पानं खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या, औषधांचा वास आणि घाणीचे साम्राज्य हीच पालिका रुग्णालयांची ओळख गेल्या काही वर्षांमध्ये झाली आहे़

पालिका रुग्णालयांच्या सफाईचे खासगीकरण
मुंबई : पानं खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या, औषधांचा वास आणि घाणीचे साम्राज्य हीच पालिका रुग्णालयांची ओळख गेल्या काही वर्षांमध्ये झाली आहे़ मात्र हे चित्र बदलण्यासाठी पालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे़ प्रत्यक्षात ही सफाई करण्यासाठी खाजगी संस्थेला नियुक्त करण्यात आले आहे़ त्यामुळे आरोग्य सेवेमध्ये हे एक प्रकारचे खाजगीकरणच असल्याचे बोलले जात आहे़
महापालिकेची तीन प्रमुख रुग्णालये, १६ उपनगरीय आणि पाच विशेष रुग्णालये आहेत़ आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची असते़ रुग्णांना संसर्ग होऊ नये, यासाठी वापरलेल्या औषधांची विल्हेवाट वेळीच लावणे महत्त्वाचे असते़ मात्र ही स्वच्छता पालिका रुग्णालयांमध्ये दिसून येत नाही़ केंद्राच्या स्वच्छता मोहिमेंतर्गत सर्वत्र विशेष सफाई मोहीम होत असते़
परंतु रुग्णालयांमध्ये ही स्वच्छता अपवादानेच दिसून येते़ कर्मचारी कमी असल्याने सफाई होत नसल्याची सबब पालिका प्रशासनाने पुढे केली आहे़ जेथे कर्मचारी कमी आहेत, त्या रुग्णालयांमध्येख साफसफाईसाठी खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात येत असल्याचा युक्तिवाद पालिका प्रशासन करीत आहे़ तीन कंपन्यांना प्रत्येकी ५ कोटी असे १५ कोटी रुपयांचे कंत्राट वर्षभरासाठी देण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
>अशी आहेत कंपनीची नावे :
मे़ ब्रिस्क फॅसिलिटी प्रा़ लि़, मे़ बीव्हीजी इंडिया
प्रा़ लि़, क्रिस्टल इंटिग्रेडेट प्रा़लि़ या तीन कंपन्यांना वर्षभरासाठी रुग्णालयांच्या सफाईचे कंत्राट
देण्यात आले आहे़
भाजपा नेत्याच्या कंपनीला कंत्राट : सफाईचे कंत्राट भाजपाच्या एका नेत्याच्या कंपनीला देण्यात आले आहे़, असा आरोप होताच या कंपनीने चांगले काम न केल्यास त्यांना दंड आकारला जाणार आहे़ त्याचबरोबर या कंपन्यांची मुदतही वाढविण्यात आलेली नाही़