३१ वर्षांपासून फरार असलेला कैदी पकडला
By Admin | Updated: May 17, 2014 21:46 IST2014-05-17T19:52:06+5:302014-05-17T21:46:44+5:30
संचित रजेवर बाहेर गेल्यानंतर तब्बल ३१ वर्ष फरार असलेल्या कैद्याला दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

३१ वर्षांपासून फरार असलेला कैदी पकडला
पुणे : खुनाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असताना संचित रजेवर बाहेर गेल्यानंतर तब्बल ३१ वर्ष फरार असलेल्या कैद्याला दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
व्ही. के. हगवणे (वय ६३, रा. मुळशी) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांंनी दिलेल्या माहितीनुसार, हगवणे याच्यावर खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खून केल्याचा १९७८ सालचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली होती. ही शिक्षा भोगत असताना तो १५ नोव्हेंबर १९८३ रोजी संजित रजेवर कारागृहाबाहेर गेला. त्यानंतर तो पसार झाला. तब्बल ३१ वर्ष फरार असलेल्या हगवणे याच्याबाबत पोलीस कर्मचारी उत्तम बुदगुडे यांना माहिती मिळाली. त्यानुसार कोंढव्यातील केदारी गार्डन मंगल कार्यालयाच्या गेटसमोरुन सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
----
कोरेगाव पार्क येथील हॉलमार्क ऑक्सफर्ड सोसायटीसमोरील पदपथावरुन जात असलेल्या एका परदेशी विद्यार्थीनीची बॅग लंपास करणा-या चोरट्याला दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. निलेश मुकेश मलके (वय २२, रा. भाटनगर, येरवडा) असे अटक चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक महागडा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.