सांगली जिल्हा बँकेवर प्राप्तिकर विभागाचा छापा

By Admin | Updated: December 26, 2016 20:36 IST2016-12-26T20:36:56+5:302016-12-26T20:36:56+5:30

संशयास्पद व्यवहारांची व संबंधित खात्यांची चौकशी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने सोमवारी जिल्हा बँकेच्या सांगलीतील मुख्य शाखेत छापा टाकला.

Print of Income Tax Department on Sangli District Bank | सांगली जिल्हा बँकेवर प्राप्तिकर विभागाचा छापा

सांगली जिल्हा बँकेवर प्राप्तिकर विभागाचा छापा

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 26 - नोटाबंदीनंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या संशयास्पद व्यवहारांची व संबंधित खात्यांची चौकशी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने सोमवारी जिल्हा बँकेच्या सांगलीतील मुख्य शाखेत छापा टाकला. सरासरी प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या 23 शाखांची तपासणी प्राप्तिकर विभागामार्फत सुरू झाल्याचे समजते.

प्राप्तिकर विभागाच्या सात अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी दुपारी दीड वाजता बँकेत दाखल झाले. त्यांनी अचानक बँकेशी संबंधित नसलेल्या सर्व लोकांना बाहेर काढले. अधिकाऱ्यांना तातडीने सर्व कागदपत्रे एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या. तपासणीला सुरुवात झाल्यानंतर बँकेभोवती पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. येणाऱ्या-जाणाऱ्यांना अटकाव केला जात होता. दिवसभर या पथकाने तपासणी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या 15 दिवसांत नाबार्डनेही तपासणी केली होती. प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या जिल्ह्यातील इस्लामपूर, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, सावळज, कडेगाव, विटा, मिरज मार्केट यार्ड, सांगली मार्केट यार्डसह 16 शाखांची तपासणी केली होती. याशिवाय अन्य तालुकास्तरीय शाखांचीही तपासणी करण्यात आली होती. सरासरी प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या एकूण 19 शाखा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.

नाबार्डच्या पथकाने याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता. दोन टप्प्यात ही तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल आयकर विभागालाही दिला होता. ज्या खातेदारांनी एक लाखाहून अधिक रकमेचा भरणा खात्यात केला आहे, अशा सर्व खातेदारांची यादी वित्तीय आसूचना एककनेही (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट) मागविली आहे. 20 डिसेंबर रोजी याबाबतची यादी जिल्हा बँकेने संबंधित खात्याकडे पाठवून दिली. अशा सर्व स्तरावर तपासण्या झाल्यानंतर आयकर विभागाने छापा टाकला आहे. नाबार्डने 10 डिसेंबर रोजी ज्यावेळी जिल्हा बॅँकेच्या मुख्य शाखेतून जुन्या नोटांबाबतची माहिती घेतली, त्यावेळी 19 शाखांमधील जमा झालेल्या रकमा प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्या. या एकोणीस शाखांपैकी सर्वात जास्त उलाढाल असलेल्या सहा शाखांची तपासणी सुरुवातीच्या टप्प्यात झाली होती.
जुन्या नोटांबाबततच चौकशी
जुन्या नोटा स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेने तीन दिवस चालविली. याच कालावधित मोठ्या प्रमाणावर नोटा जमा झाल्याचा संशय नाबार्डने व्यक्त केला होता. जिल्हा बँक अध्यक्षांनी, असे कोणतेही संशयास्पद व्यवहार बँकेत झाले नसल्याचे सांगितले होते. तरीही नाबार्ड आणि वित्तीय आसूचना कार्यालयाने बँकेच्या खात्यांची तपासणी केली.

Web Title: Print of Income Tax Department on Sangli District Bank