भूमीपूत्रांना रोजगारात प्राधान्य - नरेंद्र मोदींचे आश्वासन
By Admin | Updated: August 16, 2014 15:00 IST2014-08-16T14:52:58+5:302014-08-16T15:00:14+5:30
जेएनपीटी सेझच्या माध्यमातून निर्माण होणा-या रोजगारात भूमीपूत्रांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले

भूमीपूत्रांना रोजगारात प्राधान्य - नरेंद्र मोदींचे आश्वासन
>ऑनलाइन टीम
उरण, दि. १६ - जेएनपीटी सेझच्या माध्यमातून निर्माण होणा-या रोजगारात भूमीपूत्रांना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. उरण येथे उभारण्यात येणा-या देशातील पहिल्यावहिल्या बंदरावर आधारित सेझ प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी बोलताना स्थानिक भूमीपूत्रांना रोजगार मिळावा हाच या प्रकल्पामागे एकमेव उद्देश असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी केंद्रीय जहाज बांधणी, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के. शंकरनारायणन, विनोद तावडे, एकनाथ खडसे आदी नेते उपस्थित होते.
या समारंभात मोदी म्हणाले, 'पंतप्रधान झाल्यावर महाराष्ट्रातील आपला हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम असून तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणा-या रायगडमध्ये होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो.' यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकारही केला. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वितरणही करण्यात आले.
उरणजवळील करळ गाव ते दास्तानदरम्यानच्या २७७ हेक्टर (६८४ एकर) जागेवर सेझची उभारणी करण्यात येणार आहे. जेएनपीटीत दोन टप्प्यांत सेझची उभारणी केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात तीन हजार कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात चार हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.