कडधान्य दर घसरूनही डाळींचे दर कडाडलेलेच
By Admin | Updated: September 11, 2016 18:47 IST2016-09-11T18:47:12+5:302016-09-11T18:47:12+5:30
सात ते आठ महिन्यापूर्वी १६ हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला उडीद आता ७ हजार रुपये अर्थात अर्ध्याहून कमी दरातही खपेनासा झाला आहे.

कडधान्य दर घसरूनही डाळींचे दर कडाडलेलेच
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ११ : मागील काही दिवसांपासून नव्या धान्याची आवक सुरू झाल्यानंतर तूर, मुग आणि उडीद या कडधान्याचे दर दिवसेंदिवस घसरत असतानाही बाजारात डाळींचे दर मात्र कडाडलेलेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची चांगलीच गळचेपी होत असल्याचे दिसत आहे.
खरीप हंगामातील मूग आणि उडीद ही पिके कमी दिवसांची असल्यामुळे बाजारात या पिकांच्या धान्याची आवक मागील १५ दिवसांपासून सुरू झालेली आहे. या कडधान्याची आवक सुरू होण्यापूर्वीच धान्य बाजारात विविध धान्याचे दर कोसळणे सुरू झाले होते. यामध्ये प्रामुख्याने तूर, मुग आणि उडीद या कडधान्याचा समावेश आह. सात ते आठ महिन्यापूर्वी १६ हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला उडीद आता ७ हजार रुपये अर्थात अर्ध्याहून कमी दरातही खपेनासा झाला आहे.
जवळपास १५ हजार रुपये असलेली तूर आता ६ ते साडे सहा हजार रुपये प्रतिक्विंटलही खपेनासी झाली आहे. त्याशिवाय ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटल खपणारा मूग आता पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आत खपत आहे. आता कडधान्याचे भाव अर्ध्यावर आले असताना डाळींचे दर मात्र कमी झालेले नाहीत. जिल्ह्यातील बाजारातून घेतलेल्या आकडेवारीनुसार मूग डाळ ९० ते १०० रुपये प्रति किलो, उडीद डाळ १२० ते १३० रुपये प्रति किलो आणि तुरीची डाळही ११० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यावरून बाजार व्यवस्था सर्वसाधारण जनतेची लूट करीत असल्याचे स्पष्ट होत असून, शासनाने याची दखल घेणे आवश्यक आहे.