नामदेव मोरे, उपमुख्य उपसंपादक -
आंबा हंगामात गुढीपाडवा या सणाला विशेष महत्त्व असते. या दिवशी घरोघरी आमरस-पोळी किंवा आमरस-पुरीचा बेत केला जातो. साधारणपणे पाडव्याच्या सुमारास हापूस सामान्यांच्या आवाक्यात येऊ लागतो. मात्र, यंदा परिस्थिती उलट आहे. कमी आवक आणि खराब हवामानामुळे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आमरसाचा आस्वाद घेण्यासाठी पाडव्याऐवजी अक्षय्य तृतीयेपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
दरवर्षी वर्षारंभी किंवा मावळत्या वर्षाच्या अखेरीस हापूसची पहिली पेटी मुंबई एपीएमसीत दाखल होते. मात्र, नियमित आवक फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होते. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये १,९८३ टन आंब्याची आवक झाली होती, तर मार्चमध्ये १६,९८४ टन आंबा बाजारात दाखल झाला होता. यंदा मात्र फेब्रुवारीमध्ये केवळ ३६३ टन आणि १० मार्चपर्यंत १,२८९ टन इतकीच आवक झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाडव्यापर्यंत केवळ ९ टक्के आवक झाल्याचे चित्र असेल.
खराब हवामानाचा मोठा फटका कोकणातील हापूस आंब्याच्या बागांना बसला आहे. ८० ते ९० टक्के पिकाचे नुकसान झाल्याने बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सध्या कोकणातून सरासरी १,२०० ते १,५०० पेट्या, तर इतर राज्यांतून ११ ते १२ हजार पेट्यांची आवक सुरू आहे.
सद्य:स्थितीत बाजार समितीत हापूस ३ ते ४ हजार रुपये डझन दराने विकला जात आहे, तर किरकोळ बाजारात हा दर ४ ते ६ हजार रुपये डझनपर्यंत पोहोचला आहे. इतर राज्यांतील आंबा ८०० ते १,८०० रुपये डझन दराने घाऊक बाजारात उपलब्ध असून, किरकोळ बाजारात त्याचे दर १,००० ते २,२०० रुपयांपर्यंत आहेत.
कोकणातील हापूससह तसेच दक्षिणेकडील आंब्यांचे दरही आवाक्याबाहेर गेल्याने पाडवा आमरसाशिवाय साजरा करावा लागण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांच्या मते, मार्चअखेरपासून आवक वाढेल आणि अक्षय्य तृतीयेपर्यंत दर कमी होऊ शकतील. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदा स्वस्त आंबा मिळण्याची शक्यता कमी आहे.
भाव दहापट गतवर्षी गुढीपाडव्याच्या काळात हापूस आंबा ३०० ते १,२०० रुपये डझन दराने विकला जात होता, तर दक्षिणेकडील आंबा २५० ते ८०० रुपये डझन दराने उपलब्ध होता. यंदा हाच दर अनुक्रमे ३,००० ते ४,००० आणि ८०० ते १,८०० रुपये डझन इतका असून, जवळपास दहापट वाढ झाली आहे.
तीन वर्षांपासून पाडव्याला घसरणमुंबई बाजार समितीमध्ये २०२४ मध्ये गुढीपाडव्याला ९१ हजार पेट्यांची आवक झाली होती. २०२५ मध्ये आंब्याच्या ५० हजार पेट्यांची आवक झाली होती.यावर्षी सरासरी १२ ते १३ हजार पेट्यांची आवक सुरू असून, प्रत्यक्षात गुढीपाडव्याला किती पेट्यांची आवक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Hapus mango prices skyrocket this Gudi Padwa due to poor weather and low supply. Consumers may need to wait until Akshaya Tritiya for prices to drop. Prices are ten times higher than last year.
Web Summary : इस गुड़ी पड़वा पर खराब मौसम और कम आपूर्ति के कारण हापुस आम की कीमतें आसमान छू रही हैं। उपभोक्ताओं को कीमतों में गिरावट के लिए अक्षय तृतीया तक इंतजार करना पड़ सकता है। कीमतें पिछले साल की तुलना में दस गुना अधिक हैं।