स्वच्छतेच्या लक्ष्मीला आला ‘सोन्या’चा भाव
By Admin | Updated: November 16, 2014 23:53 IST2014-11-16T22:00:31+5:302014-11-16T23:53:33+5:30
निमित्ता अभियानाचे : केरसुण्या, फुलझाडू, मोयल यांची मागणी वाढली

स्वच्छतेच्या लक्ष्मीला आला ‘सोन्या’चा भाव
मेहरुन नाकाडे - रत्नागिरी --पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छतेला’ प्राधान्य देत अखंड देशभरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. वर्षानुवर्षे कोळीष्टके, धुळीत खितपत पडलेल्या फाईल्स धुळीतून बाहेर आल्या. सरकारी कार्यालयातील कोळीष्टके काढून साफसफाई करण्यात आली. एकूणच स्वच्छता मोहीमेमुळे केरसुण्या, फुलझाडू, मोयल यांची मागणी मात्र वाढली आहे.
हिंदूधर्मियामध्ये झाडूला ‘लक्ष्मी’च प्रतिक म्हटलं जातं. त्यामुळे दिवाळी लक्ष्मीपूजनादिवशी नव्या कोऱ्या झाडूला हळदकुंकू वाहून पूजा केली जाते. इतकेच नव्हे तर नवीन झाडू वापरात आणण्यापूर्वी तिला हळदकुंकू वाहण्याची प्रथा आहे. झाडूमुळे स्वच्छतेचे महत्व कळते. दस्तुरखुद्द पंतप्रधानांनी ‘स्वच्छ देश-सुंदर देश’ संकल्पनेस प्राधान्य दिल्यामुळेच देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
कार्यालयांचे नूतनीकरण करण्यात आलेले असले तरी अडगळीत किंवा कार्यालयातील उंच कपाटावर वर्षानुवर्षांच्या कागदपत्रांची गाठोडी ठेवण्यात आली होती. मात्र पंतप्रधांनाच्या स्वच्छतेमुळे धुळीने रंग बदलेली गाठोडी खाली आली. उपयोगी नसलेली कागदपत्रे बाजूला काढून रद्दी देण्यात आली आहेत. शासकीय कार्यालयांतील कोळीष्टके, जळमटे, धूळ दूर झाली आहे. शिवाय पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले कोपरे स्वच्छ झाले आहेत.
शाळांमधून स्वच्छता सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या केरसुण्या, मोयलं, फुलझाडू यांचाही खप वाढला आहे. मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीतही प्रामुख्याने वाढ झालेली दिसून येत आहे. कोकणातील घरांच्या परसदारात किमान चार पाच नारळाची झाडे असल्यामुळे केरसुण्या घरोघरी तयार केल्या जातात. किंबहुना बाजारात विक्रीस असलेल्या केरसुण्या स्थानिकच विक्रीस असतात. ३५ ते ४० रूपयांने विकण्यात येत होत्या परंतु आता त्याच झाडू आता ५० ते ५५ रूपये दराने विकण्यात येत आहेत.
फूलझाडू व मोयलं आसाममध्ये तयार केले जातात. त्यासाठी लागणारा कच्चा माल आसामहून मुंबई किंवा अन्य छोट्या मोठ्या शहरात आणून त्याच्या झाडू विणल्या जातात. फूलझाडू छोट्या, मध्यम व लांब अशा तीन प्रकारात उपलब्ध आहेत. काही झाडू सुतळीने, प्लास्टिकने बांधलेल्या असतात. तर काही झाडू चक्क प्लास्टिकच्या मूठीच्या असतात. ४० ते १२० रूपये दराने फूलझाडूंची विक्री सुरू आहे. तर मोयलं २० रूपये दराने विकण्यात येत आहेत.
उंचावरील धूळ किंवा जळमटे काढण्यासाठी लांब काठीला मोयलं बांधून सफाई केली जाते. त्यामुळे मोयलांना प्रामुख्याने मागणी होत आहे. सध्या प्लास्टिकच्या झाडूही विक्रीस आल्या आहेत. वॉशेबल असल्याने या झाडू टिकतातही चांगल्या. ८० ते १२० रूपये दराने झाडूची विक्रीस सुरू आहे. उंचावरील सफाई करण्यासाठी कमी जास्त अंतर अॅडजेस्ट करणाऱ्या प्लस्टिकच्या झाडूही विक्रीस उपलब्ध आहेत.