Birth Certificate: राष्ट्रपती सुटले, पंतप्रधान अटकले; जन्म दाखल्यासाठी पालकाचे खेटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 07:11 IST2022-01-04T07:11:42+5:302022-01-04T07:11:59+5:30
Child names President, Prime minister: का दाम्पत्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवले. तर महिनाभरापूर्वी जन्मलेल्या दुसऱ्या बाळाचे नाव पंतप्रधान ठेवले. राष्ट्रपतीला जन्म दाखला मिळाला.

Birth Certificate: राष्ट्रपती सुटले, पंतप्रधान अटकले; जन्म दाखल्यासाठी पालकाचे खेटे
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरगा (जि. उस्मानाबाद) : होय,
हे खरंय ! पंतप्रधानांचा जन्म दाखला लालफितीत अडकून पडलाय. त्याचे झाले असे, चिंचोली (भु.) येथील एका दाम्पत्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवले. तर महिनाभरापूर्वी जन्मलेल्या दुसऱ्या बाळाचे नाव पंतप्रधान ठेवले. राष्ट्रपतीला जन्म दाखला मिळाला. मात्र, पंतप्रधान हे संविधानिक पदनाम असल्याचे सांगत त्याचा जन्म दाखला लटकून ठेवण्यात आला आहे.
चिंचोली भु. (जि. उस्मानाबाद) येथील दत्ता व कविता चौधरी या दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले. या नावाचा जन्म दाखलाही त्यांना मिळाला. तसे आधार कार्डही त्यांनी बनविले. यानंतर १० नोव्हेंबर २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरामणी (जि.सोलापूर) येथे त्यांना दुसरे बाळ झाले.
या बाळाचे नाव त्यांनी रिवाजाप्रमाणे बारसे घालून ‘पंतप्रधान’ असे ठेवले. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयात दत्ता
चौधरी यांनी जन्म दाखला मिळण्याकरिता २७ नोव्हेंबर रोजी अर्ज सादर केला.
परंतु ‘पंतप्रधान’ हे संविधानिक पदनाम असल्यामुळे हे नाव बालकास द्यावे किंवा कसे, याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी आरोग्य केंद्राने सोलापूरच्या जिल्हा निबंधक, जन्म-मृत्यू तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे १ डिसेंबर रोजी पत्र पाठवले. यास आता
महिना उलटून गेला तरी ना मार्गदर्शन मिळाले, ना जन्म दाखला. इकडे पंतप्रधानांचे पालक दत्ता चौधरी मात्र, सातत्याने आरोग्य केंद्रात खेटे घालत आहेत.
माझ्या पहिल्या मुलाचा ‘राष्ट्रपती’चा जन्म दाखला मिळाला आहे. या नावाने आधार कार्डही बनवून घेतले आहे; परंतु दुसऱ्या मुलाचे ‘पंतप्रधान’ हे नाव संविधानिक असल्यामुळे हे नाव बालकास द्यावे किंवा कसे याबाबत आता मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. याबाबत काहीच ठोस निर्णय कोणी घेईना. सर्व अधिकारी टोलवाटोलवी करीत आहेत.
- दत्ता चौधरी, पालक