मधुर भांडारकर यांची सुपारी देणाऱ्या मॉडेल प्रीती जैनला कारावास
By Admin | Updated: April 29, 2017 03:03 IST2017-04-29T03:03:21+5:302017-04-29T03:03:21+5:30
प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने मॉडेल, अभिनेत्री प्रीती जैन हिच्यासह

मधुर भांडारकर यांची सुपारी देणाऱ्या मॉडेल प्रीती जैनला कारावास
मुंबई : प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने मॉडेल, अभिनेत्री प्रीती जैन हिच्यासह अन्य दोघांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. मात्र या सर्वांची लगेचच जामिनावर सुटका करण्यात आली.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, लग्नाचे खोटे आश्वासन देऊन मधुर भांडारकर यांनी वारंवार बलात्कार केल्याचा आरोप प्रीतीने केला होता. नंतर तिने २००५मध्ये कुख्यात गुन्हेगार अरुण गवळी याचा हस्तक नरेश परदेशी याला भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिली. त्यासाठी ७५ हजार रुपयेही आगाऊ रक्कम म्हणून दिले.
परदेशीने दिलेले काम पूर्ण न केल्याने प्रीतीने त्याच्याकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला. याचदरम्यान पोलिसांना एकाने याची टिप दिली. त्याची शहानिशा करत पोलिसांनी सप्टेंबर २००५मध्ये परदेशीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी जैन आणि परदेशीचा साथीदार व शार्पशूटर शिवराम दास या दोघांना अटक केली. दासने परदेशीला शस्त्र मिळवून देण्यास मदत केली होती. या दोघांशिवाय पोलिसांनी संशयावरून गवळीच्या अन्य दोन हस्तकांनाही ताब्यात घेतले होते. तथापि, सबळ पुराव्याअभावी त्यांची सुटका करण्यात आली.
विशेष न्यायालयाचे न्या. एस. एम. भोसले यांनी प्रीतीसह अन्य दोघांना शिक्षा ठोठावल्यानंतर तिघांनीही जामिनासाठी अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या हमीवर तिघांचाही जामीन मंजूर केला आहे. (प्रतिनिधी)