मुंबई : सलग झोडपून काढणाऱ्या वादळी पावसाने सोमवारीही दाणादाण उडविली. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना या पावसाचा तडाखा बसला. घरांची पडझड, पिकांची नासाडी आणि पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. राज्यात ४१ हून अधिक जनावरे दगावली. वीज कोसळून यवतमाळ आणि नाशिक येथे दोन जणांचा जालनात दोघांचा मृत्यू झाला.
पिंपळगाव ई (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथे शेतात वीज पडून विमलबाई किसन भिसे (३६) या महिलेचा मृत्यू झाला. मौजे सुकेणे (ता. निफाड, जि. नाशिक) येथे दीपक रंगनाथ रहाणे (३८) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला, तर जातेगाव (ता. नाशिक) येथे युवक जखमी झाला. कोठा कोळी (ता. भोकरदन, जि. जालना) येथे वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला.
निफाड तालुक्यात गारांचा पाऊस झाला, तर येवला, सिन्नर, चांदवड, मनमाड आदी तालुक्यांना जोरदार पावसाने झोडपले. सप्तशृंगीदेवी गड घाटरस्त्यावरील दगड एका वाहनावर पडल्याने नुकसान झाले. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. लातूर जिल्ह्यात वीज पडून विविध भागांत १९ जनावरे दगावली. जळगाव जिल्ह्यात रविवारच्या वादळी पावसामुळे तीन घरांची पडझड झाली.
२७ हजार हेक्टरला फटका, पंचनामे करण्याचे आदेश अवकाळीमुळे राज्यात २७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीत १३ हजार, नाशिकमध्ये ५,८५० हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. लवकर पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.