मशिदीच्या आवारातच नमाज अदा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2015 02:06 IST2015-09-15T02:06:29+5:302015-09-15T02:06:29+5:30
पनवेल शहरातील मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मशीद ट्रस्टने स्वत:हून पुढाकार घेतला. आता मोमीनपाडा मशीद ट्रस्टने रस्त्यावर

मशिदीच्या आवारातच नमाज अदा होणार
पनवेल : पनवेल शहरातील मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मशीद ट्रस्टने स्वत:हून पुढाकार घेतला. आता मोमीनपाडा मशीद ट्रस्टने रस्त्यावर अदा करण्यात येणारा नमाज मशिदीत अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी पोलिसांनी बैठक घेतली.
न्यायालयाच्या निर्देशानुसार, सगळे सण-उत्सव कायदा व सुव्यवस्थेच्या चौकटीत राहून साजरे करण्यात येत आहेत. दहीहंडी उत्सव न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे साजरा करण्यात आला. गणेशोत्सवसुद्धा नियम व अटींना अधीन राहून साजरा करण्याची तयारी मंडळांनी दर्शवली आहे. डीजे, साऊंड सिस्टीमचा वापर न करणे, रात्री १०नंतर स्पीकर बंद, रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी मंडप न टाकणे असे निर्बंध घालण्यात आले आहेत.
दहीहंडी उत्सवानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी शहरातील सगळ्या मशीद ट्रस्टच्या प्रमुखांची बैठक घेऊन न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत सर्व ११ मशीद ट्रस्टने बाहेरचे भोंगे उतरविण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी या निर्णयाचे अनुकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आणखी एक स्तुत्य पाऊल मोमीनपाडा येथील याकुब बेग ट्रस्टच्या वतीने टाकण्यात आले आहे. त्यांनी मशिदीबाहेरील रस्त्यावर अदा करण्यात येणारी नमाज मशिदीच्या आवारातच अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष करून शुक्रवारी एक ते दीड हजार मुस्लीम बांधव या ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी येतात. बाजारपेठेतील रस्त्यावर नमाज अदा होत असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. रमजान महिन्यात तर तीन हजार मुस्लीमबांधव नमाज अदा करण्यासाठी येत असल्याने
मोठी कोंडी होते. यासंदर्भात ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अल-हज-मुस्तफा याकुब बेग उर्फ मुन्नाभाई व इतर समाजधुरिणींची बाजीराव भोसले यांनी सोमवारी भेट घेतली व या विषयावर चर्चा केली.
बेग यांनी यापुढे रस्त्यावर नमाज अदा होणार नसल्याचे सांगितले. तसे संदेश त्यांनी सगळ्यांकडे पाठवले. पोलिसांनी ट्रस्टच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
न्यायालयाचा आदेश सगळ्यांनाच बांधील आहे. त्याचे पालन सर्वांनीच केले पाहिजे. त्यामुळे यापुढे नमाज अदा करतेवेळी इतर बांधवांना त्रास होऊ नये याकरिता मशिदीच्या आवारातच नमाज अदा करण्यात येतील. त्याचबरोबर बाजूला असलेला भूखंडाची साफसफाई करून तिथे जागा करण्याचा आमचा मानस आहे. - मुस्ताफा बेग, मुख्य विश्वस्त याकुब बेग ट्रस्ट, पनवेल