प्रज्ञा पाटील यांचा सलग 103 तास योगासनं करण्याचा विश्वविक्रम

By Admin | Updated: June 20, 2017 16:35 IST2017-06-20T16:03:59+5:302017-06-20T16:35:27+5:30

गेल्या काही वर्षांपासून योगासनाला वाहून घेतलेल्या नाशिक येथील प्रज्ञा पाटील यांनी तब्बल १०३ तास सलगपणे योगासने करून विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

Pradnya Patil's record for 103 hours in a row | प्रज्ञा पाटील यांचा सलग 103 तास योगासनं करण्याचा विश्वविक्रम

प्रज्ञा पाटील यांचा सलग 103 तास योगासनं करण्याचा विश्वविक्रम

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 20-   शरीराबरोबर मनाचाही व्यायाम होणं गरजेचे असून यासाठी योगासनं करणं हे उत्तम साधन असल्याने गेल्या काही वर्षांपासून योगासनाला वाहून घेतलेल्या नाशिक येथील प्रज्ञा पाटील यांनी तब्बल १०३ तास सलगपणे योगासने करून विश्वविक्रमाची नोंद केली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता सलग योगासनांचं १०३ तासाचं काऊंटडाऊन संपल्यानंतर उपस्थित योगाप्रेमीनी एकच जल्लोष केला.

इगतपुरीजवळील पिंप्री सदो या गावानजीक हा विश्वविक्रम नोंदविण्यात आला.नाशिकच्या 48 वर्षीय योगाशिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सतत १०० तास योगा करून एक नवा इतिहास रचण्याचा संकल्प केला होता.यानुसार शुक्रवार दिनांक १६ जून रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांनी या योगा मॅरेथॉनला आरंभ केला. योगासनांची विविध आसने करीत त्यांनी रविवार दिनांक १८ रोजी दुपारी दीड वाजता तामिळनाडूच्या के.पी.रचना यांचा ५७ तासाचा विक्रम मोडीत काढीत डॉ. व्ही.गणेशकरण यांचाही ६९ तासाचा विक्रम त्याच दिवशी मोडीत काढला.मात्र त्या यावरच न थांबता त्या संकल्पानुसार सलगपणे योगासने करीत राहिल्या.
दरम्यान आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी सलग योगासनांचे शंभर तास पार केले.मात्र तरीही न थांबता त्यांनी १०३ तासाचा विक्रम पूर्ण करीत आपल्या या  विक्रमाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकोर्ड नोंद केली. यावेळी गिनीज बुकचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.

यावेळी आमदार देवयानी फरांदे,प्रा.डॉ.मीनाक्षी गवळी,उद्योजक अविनाश गोठी, रोहिणी नायडू भाजपाच्या शहर उपाध्यक्ष सोनल दगडे,संध्या शिरसाट,मनोरमा पाटील,दीपाली गवांदे,अश्विनी डोंगरे,मीनाक्षी अहेर,वंदना रकीबे,गौरव पाटील,गौरागी पाटील आदी उपस्थित होते.

"शरीराबरोबर मनाचाही व्यायाम होणाऱ्या योगसाधनेला जागतिक किर्ती मिळावी आणि नाशिक जिल्ह्याची जागतिक स्तरावर नवी ओळख व्हावी, यासाठी आपण शंभर तास योगा करण्याचा संकल्प केला होता.संकल्प जरी केला तरी गंभीर आव्हान माझ्यापुढे उभे राहिले होते. ज्या वयात माणसाला शरीर साथ देत नाही त्या वयात सलगपणे योगासने करणे म्हणजे एक आव्हानच होते.मात्र योगाप्रेमी आणि कुटुंबातील सदस्य,आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या धैर्यामुळे हा विक्रम करणे शक्य झालं," असं मत प्रज्ञा पाटील यांनी व्यक्त केलं आहे. 
 

Web Title: Pradnya Patil's record for 103 hours in a row