खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
By Admin | Updated: August 24, 2016 03:02 IST2016-08-24T03:02:35+5:302016-08-24T03:02:35+5:30
बांधकाम खात्याने सजगता न दाखविल्यामुळे खड्डे जैसे थे असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.

खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील रस्त्यांसंदर्भातील बांधकाम खात्याने सजगता न दाखविल्यामुळे खड्डे जैसे थे असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. गेले दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेऊन सुद्धा मुरुडच्या अभियंत्याकडून कोणतेही समाधानकारक काम होत नसल्याने तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुरुड तालुक्यातील आगरदांडा सावली, नांदले, खोकरी, खारआंबोली या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावरचे खड्डे डांबर वापरून रोलरचा वापर करून बुजवावेत अशी मागणी होत आहे. खड्डेमुक्त रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. खड्डेविरहित चांगल्या दर्जाचे रस्ते नागरिकांसाठी उपलब्ध करण्याचे घटनात्मक आणि कायदेशीर बंधन राज्य सरकार व स्थानिक प्रशासनावर बंधन आहे. असे असले तरी त्या संदर्भात अंमलबजावणी होताना दिसत नाही.
पंधरा दिवसावर गणपती उत्सव आला तरी बांधकाम खात्याकडून रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याचे कोणतेही ठोस पावले उचलल्याचे दिसले नाही. आगरदांडा या रस्त्यापासून ते मिठागरपर्यंत रस्ते नव्हे तर खड्ड्यांचे साम्राज्य झालेले दिसून येते. या रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यास मुरुड तालुक्यातील अभियंता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून के ला जात आहे. गणपती येण्याआधी आगरदांडा ते मिठागरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी होत आहे. या रस्त्यासाठी अनेक नागरिकांनी कित्येक वेळा निवेदन दिले, मात्र या रस्त्याकडे बांधकाम खाते दुर्लक्ष करत आहे. या रस्त्यावर खड्डेमुक्त रस्ते कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
>नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
नांदगाव/ मुरु ड : मुरु ड तालुक्यातील सर्वात जास्त खड्डे आगरदांडा, सावली, नांदले, खारआंबोली या भागात पडलेले असून सुद्धा बांधकाम खाते या भागासाठी कोणतेच प्रयत्न करताना आढळून येत नाही. गणपती उत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची जबाबदारी असून सुद्धा येथे खड्डे न बुजविल्याने नागरिकांनी राग व्यक्त करून आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे किरकोळ अपघात सुद्धा झाले आहेत. तर एक महिला प्रसूतीसाठी दवाखान्यात जात असताना विक्र म रिक्षातच तिची प्रसूती झाली. अशा अनेक संकटांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहेत.