पूजा खेडकरच्या आई-वडिलांकडे दोन कोटींच्या १२ मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:55 IST2025-03-18T12:55:13+5:302025-03-18T12:55:39+5:30

याबाबत १० मार्च रोजी सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. 

Pooja Khedkar's parents own 12 properties worth Rs 2 crore. | पूजा खेडकरच्या आई-वडिलांकडे दोन कोटींच्या १२ मालमत्ता

पूजा खेडकरच्या आई-वडिलांकडे दोन कोटींच्या १२ मालमत्ता

पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात तिच्या पालकांच्या नावावर तब्बल १२ मालमत्ता आढळल्या. पूजा खेडकर हिच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्तांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविलेल्या अहवालात या मालमत्तांचा उल्लेख आहे. याबाबत १० मार्च रोजी सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. 

वडील दिलीप खेडकर वर्ग एक अधिकारी असूनही पूजाने नॉन क्रिमिलेअर गटातून यूपीएससी परीक्षेत आयएएस हे पद मिळवले. हे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र  पाथर्डी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे उघड झाले होते. नाशिक विभागीय आयुक्तांनी या प्रमाणपत्राबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतर अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीप व आई मनोरमा खेडकरांच्या मालमत्तांची चौकशी सुरू केली. 

कुणाच्या नावावर काय? 
मनोरमा खेडकर यांच्या नावे ५ लाख ६० हजार, ४२ लाख २५ हजार, १ लाख ५ हजार अशा तीन मालमत्तांची नोंद असल्याचे सांगितले आहे. या तीनपैकी एका मालमत्तेचे बाजारमूल्य १४ लाख ६५ हजार असताना खरेदीखतामध्ये केवळ १ लाख ५ हजारांचाच उल्लेख करण्यात आला आहे. या तिन्ही मालमत्तांचे एकत्रित मूल्य ४८ लाख ९० हजार रुपये आहे. 

दिलीप खेडकर यांच्या नावे एकूण नऊ मालमत्ता असल्याचे अहवालात नमूद आहे. या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य १ कोटी ५६ लाख ९७, ५०० रुपये आहे.

अटक स्थगितीवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
पूजा खेडकर हिच्या अटकेवरील स्थगिती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात मंगळवार दि. १८ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी पूजाच्या अटकेवरील स्थगिती १७ मार्चपर्यंत वाढवली होती. त्यापूर्वी, १५ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पूजाच्या अटकेला स्थगिती दिली होती.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने गेल्या सुनावणीवेळी पूजाला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. पूजाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी न्यायालयाला सांगितले होते की, खेडकर तपासात सहकार्य करत आहेत. परंतु पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले नाही.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा २३ डिसेंबर २०२४ चा आदेश रद्द केला होता. अटकपूर्व जामीन फेटाळताना उच्च न्यायालयाने कडक टिप्पणी केली होती. १ ऑगस्ट २०२४ रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. याविरोधात पूजाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.
 

Web Title: Pooja Khedkar's parents own 12 properties worth Rs 2 crore.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.