राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा महासागर - नितीन गडकरी
By Admin | Updated: May 5, 2015 11:40 IST2015-05-05T11:30:44+5:302015-05-05T11:40:58+5:30
जकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा महासागर - नितीन गडकरी
>
नागपूर : राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन केंद्र इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण व भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. 'राजकारणात कोणीही समाधआनी नाही, नगरसेवकाला आमदार तर आमदाराला मंत्री व्हायचे असते. मंत्र्यांना चांगली खाती हवी असतात. तर मुख्यमंत्र्यांसमोर राज्याचा कारभार असताना त्यांना केंद्रात जायचे असते. इथे कोणीही तृप्त नसते. महत्वाकांक्षा प्रत्येकालाच पळायला लावत असते' असेही गडकरी म्हणाले.
दहशतवादी विचारांमुळे अनेक देशांतील स्वातंत्र्य, समता व बंधूभाव नष्ट होत आहे. लोकतंत्र, धर्मनिरपेक्षता व समाजवाद संकटात आहे. अशा परिस्थितीत जगाला दिशा दाखविण्याची शक्ती केवळ बुद्ध विचारात आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
गडकरी या कार्यक्रमासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे अध्यक्षस्थानी तर, दिल्ली विद्यापीठाचे बौद्ध अध्ययन विभागप्रमुख भदंत डॉ. सत्यपाल व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम प्रमुख अतिथी होते.
गडकरी म्हणाले, अनेक देशांनी अणुशस्त्रे विकसित केली असून,काही अणुशस्त्रांची संहारक शक्ती कल्पनातीत आहे. यामुळे सर्वत्र तणाव व अशांतता पसरली आहे. भविष्यात कोणत्या दिशेने वाटचाल करायची, यावर संपूर्ण जगात विचारमंथन सुरू आहे. याचे उत्तर केवळ बुद्ध विचारात आहे. देशाच्या प्रगतीसाठी ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान आवश्यक आहे; पण त्याशिवाय मूल्यांचे जतन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. विकासासोबत विविध प्रकारचे दोष येत असतात. त्यावर केवळ मूल्यांच्या बळावरच मात करता येते.
शैक्षणिक क्षेत्र अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. शिक्षणातील गुणात्मकता व सर्वसमावेशकता वाढली पाहिजे. शिक्षणाचा संशोधन व राष्ट्रविकासाकरिता उपयोग झाला पाहिजे. विज्ञानामुळे देशातील गरिबी दूर होऊ शकते. जगातील कोणताही धर्म वाईट नाही. हा प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे. समस्या प्रत्येक क्षेत्रात असून सर्व प्रश्न सोडविण्याची ताकद कोणामध्येही नाही, असे त्यांनी सांगितले.
नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी संचालन केले तर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांनी आभार मानले.
'धम्मरत्न सर्वश्रेष्ठ आहे. शासनाला बुद्ध विचाराचे महत्त्व पटले आहे. यामुळे बुद्ध विचारांच्या संरक्षणासाठी विविध योजना राबवून अनुदान दिले जात आहे. पाली भाषेत बुद्ध धम्मासह अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. संस्कृत व पाली भाषा एकमेकांच्या भगिनी आहेत'
-भदंत डॉ. सत्यपाल
'सर्व देश अणुशस्त्रांनी परिपूर्ण आहेत. या अणुशस्त्रांमध्ये संपूर्ण मानवजातीचा चारवेळा संहार करण्याची क्षमता आहे. कोणत्याही देशाची मानसिकता बदलल्यास काय होऊ शकते याची कल्पना न केलेलीच बरी. भविष्यात बुद्धाची शिकवणच जगाच्या कामी येणार आहे. '
-डॉ. सिद्धार्थविनायक काणे
(प्रतिनिधी)